Uncategorized

रंगते आहे हट्टीपणा, रुसवे-फुगव्यांचे राजकारण…

गेल्या काही दिवसांतील प्रमुख नेत्यांची विधाने, काही पक्षातील घडामोडी यामुळे महाराष्ट्राचे राजकीय क्षेत्र ढवळून गेले आहे. सर्वसामान्य लोकांपुढील प्रश्न आणि राजकीय पक्ष व नेते यांना भेडसावणारे प्रश्न यात मोठा फरक पडलेला आहे. नेते व त्यांचे पक्ष यांचेच प्रश्न गंभीर दिसू आणि भासू लागले तर जनतेचे काय, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार बुधवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरील एका बैठकीसाठी विधान भवनात आले होते. बैठकीनंतर ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते भेटले. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेमके काय होणार, हा पक्ष महायुतीत सामील होणार की कोणत्या पक्षात विलीन होणार याची जोरदार चर्चा सध्या सुरू असते. या पार्श्वभूमीवर पवार व शिंदे यांची भेट महत्त्वाची वाटते. पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ती फारच झोंबली असल्याचे दिसून आले.

ठाकरे यांचे विश्वासू खा. संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या बैठकीवर फारच आगपाखड केली. ती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय न बनली तरच नवल. ठाकरेंची शिवसेना राजकीयदृष्ट्या फारच संवेदनशील असते. एकीकडे भाजपासोबत जाण्याबाबतची चर्चा आपण गेली १२ वर्षे ऐकत आहोत, असे खा. सुप्रिया सुळे म्हणतात. अनेकवेळा निमंत्रण मिळूनही व काही खाती (जसे – ऊर्जा आणि आता अर्थ) ज्यांच्यासाठी राखीव ठेवली आहेत, अशी चर्चा असलेले जयंत पाटील भाजपासोबत जातीलच असे ठामपणे म्हणता येत नाही. महायुतीत नव्या पक्षाला स्थान असणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच दिल्लीत स्पष्टपणे सांगूनही पवारांच्या भेटीबाबत ठाकरेंच्या सेनेचा थयथयाट आश्चर्यजनक ठरतो.

कोणती राजकीय खेळी खेळल्यानंतर ठाकरे सेना अस्वस्थ होते व ती काय प्रतिक्रिया देते हे महायुतीतील घटक पक्षांनाच नव्हे तर महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांना चांगलेच ठाऊक आहे. पवारांविषयी बोलायचे झाले तर १९८० पासून त्यांच्यापासून अनेक लोकांनी फारकत घेतली, वेगळी राजकीय भूमिका घेतली तरी त्यांनी फार टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केली, सोडून जाणारांची अत्यंत वाईट शब्दांत निर्भत्सना केली असे दिसलेले नाही. त्यामुळेच की काय सोडून गेलेलेही त्यांना भेटत असतात, काही परत येतात. याशिवाय पवार अशा नेत्यांच्या मदतीने राजकीय चाली रचून अनपेक्षित धक्का देतात हे १९८०, ९०, २००० च्या दशकांत दिसून आले.

पवारांकडून शिवसेना काही शिकत नाही असे म्हणता येत नाही. याचे कारण शिवसेनेच्या राजकारणाचा डीएनएच वेगळा आहे. पवारांचे राजकारण मुत्सद्दीपणा, धूर्तपणा यावर चालले तर शिवसेनेचे राजकारण भावनाशीलतेवर चालले. बाळासाहेब ठाकरे हयात असताना ते आक्रमकपणा व थेट कृती यावर चालले. उद्धव ठाकरे तसे नेमस्त. केवळ भावनाशिलतेवर त्यांचा भर. बाळासाहेब आपल्या राजकीय विरोधकावर कडाडून टीका करत तेव्हा लोकांनी ती वेगळ्या अर्थाने घेतली पण तीच भाषा आताही स्वीकारली जाईल, असे ठामपणे म्हणता येत नाही. शरद पवार हे शिंदेना का भेटत असतील हे ठाकरे व त्यांच्या काही प्रमुख सहकाऱ्यांना नक्की ठाऊक असेल पण त्याबाबत त्यांना उघडपणे बोलता येत नाही. राजकारण करताना पुरेशी लवचिकता दाखवून मनासारखा निकाल मिळवता आला पाहिजे यावर पवारांचा भर तर मनासारख्या घडामोडी नाही घडल्या तरी चालतील पण लोकांचा भावनिक पाठिंबा कायम राखणे हेच खरे असे ठाकरे सेनेला वाटत आले आहे.

आज दोन गटांत विखुरला गेलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत दिसतो. शरद पवारांचे बलस्थान राहिलेल्या पुणे, सातारा, सांगली व सोलापूर या भागात फार उलथापालथ होत आहे. इथे पवारांना मानणारा राजकीय वर्ग व मतदार आपल्याकडे कसा खेचता येईल याकडे शिंदे यांचे लक्ष दिसते. त्या पार्श्वभूमीवर एक प्रयोग म्हणून सातारा जिल्हा परिषदेत शिंदे यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांना मानणारा समर्थकवर्ग यांनी सत्ता खेचण्याचा प्रयोग केला. तो प्रयोग यशस्वी ठरणे परवडणार नाही म्हणून भाजपाने कमालीच्या आक्रमकतेने ते हाणून पाडला. तो अयशस्वी ठरला असला तरी प्रांसगिक करार करून शिंदे व पवारांची राष्ट्रवादी काही प्रयोग करणारच नाही असे म्हणता येत नाही. पण अशावेळी आपण कुठे दिसत नाही आणि शिंदे तर आपल्याला चालतच नाहीत या भावनेने ठाकरे सेना अस्वस्थ होते.  

ठाकरेंच्या सेनेत कार्यरत असताना चांगले असणारे नेते पक्ष सोडून गेल्यावर वाईट ठरतात. ठाकरेंची सेना त्यांच्यावर अत्यंत विखारी भाषेच टीका करू लागते. जे शिंदे व त्यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांबाबत दिसले तेच अलीकडे पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांबाबत दिसले. सोडून गेलेले एवढे वाईट असतील तर ते पूर्वी वर्षानुवर्षे सोबत का होते, यावर ठाकरे सेना बोलत नाही. महाविकास आघाडी स्थापण्यात महत्त्वाची भूमिका असणारे शरद पवार आपल्या पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांबद्दल एवढे वाईट बोलत नाहीत किंवा सोडून गेलेले पवारांबाबत अवाक्षर काढत नाहीत, ते का? त्यातून पवार काय साध्य करतात, यावर ठाकरे सेना विचार करत नाही. परिणामी सोडून गेलेले जवळचे लोक ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांवर अत्यंत वाईट टीका करतात. असो.

शिंदे व पवार यांची भेट किंवा राजकीय सलगी भाजपालाही आवडणारी नसते. म्हणूनच की काय महायुतीत नवा पक्ष येणार नाही, असे विधान करून मुख्यमंत्री मोकळे झाले. म्हणजे या मुद्द्यावर भाजपा आणि ठाकरे सेना यांच्यात काही कुठेतरी समानता आहे. फडणवीस यांनी एका युट्यूब वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात १३७ आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल की कमी आमदार असलेल्या पक्षाचा असे विधान करून एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षरित्या उत्तर दिले. कारण शिंदे मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी ठाकरे सेना फोडत असल्याची चर्चा आहे. शिंदे नेहमी दिल्लीतील नेत्यांना भेटतात, या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य पातळीवरच्या छोट्या-छोट्या विषयांसाठी दिल्लीत येऊ नका, असे केंद्रीय नेत्यांनी सांगितले आहे. हे ही बऱ्याच गोष्टी स्पष्ट करणारे ठरते.

शिंदे यांच्या शिवसेनेपक्षा आज अजित पवारांचा राष्ट्रवादी भाजपाला जवळचा वाटतो. पण या पक्षातील घडामोडींबाबत भाजपाची नेमकी भूमिका काय, याचा कानोसा राष्ट्रवादीचे मातब्बर नेते घेत आहेत. पार्थ आणि जय पवार यांची सक्रियता जुन्या मंडळींना खटकू लागली आहे. या पक्षात सारे काही आलबेल नाही, अशी चर्चा असतानाच एक गट शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यावे या मानसिकतेचा असल्याचे बोलले जाते. खरे तर एकीकडे सुप्रिया सुळे यांना वगळून ऊर्वरित राष्ट्रवादी व पार्थ पवार यांना वगळून ऊर्वरित राष्ट्रवादी असे गणित सुटू शकते असे काहींना वाटते. पण ते शक्य होईलच याची खात्री नाही. कारण कट्टर राष्ट्रवादी समर्थकांना स्वतंत्र अस्तित्वच आवश्यक वाटते.

या मानसिक द्वंद्वातील राष्ट्रवादीचा समर्थकवर्ग सध्या एका मोठ्या घुसळणीत सापडला असताना त्याकडे भाजपा, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना लक्ष देऊन असणे क्रमप्राप्त आहे.

—————————————————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *