राजकीय महाराष्ट्रातील खंजीर क्रमांक २

राज्यात सध्या राजकीय सभांचा धडाका सुरू आहे. बेमोसमी पावसाप्रमाणे निवडणुकाविरहीत सभांची मालिका लोकांना किती आकर्षित करतेय यापेक्षा ती नेत्यांच्या मनात काय धुमसतेय हे दाखवून देत आहे. जुने हिशेब चुकते करणे सुरू आहे त्याचबरोबर भविष्यात निवडणुकांचा मोठा कार्यक्रम सुरू झाल्याबरोबर प्रचाराची पातळी काय असेल याची चुणूक दर्शवित आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा शनिवारी १४ मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुल येथे पार पडताच भारतीय जनता पार्टीकडून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेस्को सेंटर, गोरेगाव येथे आयोजित कार्यक्रमात उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी केलेली विधाने त्यांच्यात नेता म्हणून किती अमुलाग्र बदल झाला आहे हे दर्शवितात. त्यांच्या अनेक विधानांमुळे राजकीय गदारोळ उठत असला तरी एक विधान दुर्लक्षून चालत नाही. त्याकडे राजकीय क्षेत्र, विशेषतः ठाकरे कसे पाहतात हे अद्याप समजायचे आहे.

विधान तितके साधे-सरळ नाही

“तुम्ही माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझं राजकीय वजन कमी होईल, असा प्रयत्न केलात. पण लक्षात ठेवा, याच देवेंद्र फडणवीसच्या वजनानं तुमच्या सरकारचा बाबरी ढाँचा खाली आल्याशिवाय राहणार नाही”, हे ते विधान आहे. ते इतके साधे-सोपे, सरळ दिसत नाही म्हणूनच ते सहजगत्या दुर्लक्षिता येत नाही.

खंजीर क्र. १ पवार-दादा वादातील

राजकीय खंजीर महाराष्ट्राला नवीन नाही. १९७८ साली वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेसचे सरकार खाली खेचून शरद पवार यांनी सहयोगी पक्षांच्या मदतीने पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) सरकार बनविले. तसे करून त्यांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसला हा वाकप्रचार आजही वारंवार उद्धृत केला जातो. त्यावर अनेक मान्यवर बोलले आहेत. सव्यासाची संपादक गोविंदराव तळवळकर, ज्यांची स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याशी विशेष सलगी होती त्यांनीही यावर खुलासा केला तरीही तो शब्दप्रयोग काही केल्या जनमानसातून जात नाही.

पवार यांनी त्यावेळी भूमिका घेण्यामागे काय इतिहास होता याची उजळणी वारंवार करण्याची गरज नाही. कारण बहुतेकांना तो ज्ञात आहे. पण त्यावेळी राजकीय उलथापलथीत गमावलेले मुख्यमंत्रीपद राजकीय ताकदीच्या जोरावर वसंतदादांनी दोनवेळा पुन्हा मिळविले. तसेच पवार स्वतः त्यानंतर तीनवेळा मुख्यमंत्री झाले. मग असाच खंजीर खुपसून गमावलेले राजकीय वजन फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपद प्राप्त करून दाखवतील का याचे औत्सुक्य वाटू शकते.

याचे कारण भाजपाकडून सध्या खेळल्या जाणाऱ्या राजकीय चाली व त्यांच्याकडून वापरले जाणारे विविध मोहरे व क्लृप्त्या उत्सुकता वाढविणाऱ्या ठरताहेत. कधी नव्हे ती भाजपा नेत्यांची भाषा बरीच तिखट झाली आहे. ती या पक्षाच्या पारंपरिक मतदारांना किती आवडेल व नव्यांना किती आकर्षित करेल हाही औत्सुक्याचा भाग ठरावा.

सत्ता गेल्यानंतर प्रथमच फडणवीस थेट बोलले

तर फडणवीस ठाकरेंना उद्देशून म्हणाले की, माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझं राजकीय वजन कमी होईल, असा प्रयत्न केलात. असे थेट विधान नोव्हेंबर २०१९ मध्ये सत्ता गेल्यापासून फडणवीस यांनी कधी केले नव्हते. त्याचबरोबर आपल्या वजनाने तुमच्या सरकारचा बाबरी ढाँचा खाली आल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारयुक्त शब्दप्रयोगही याआधी कधी त्यांनी केला नव्हता. यातून राजकीय कडवटपणा किती टोकाला जाऊन पोहोचला आहे, हेच दिसून येते.

खरे तर २०१४ साली भाजपाने स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुका लढविण्याची व शिवसेनेशी असलेली युती तोडण्याची घोषणा केली तेव्हा फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते. पण ही घोषणा त्यांनी त्यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना करायला लावली. त्या घोषणेच्या वेळी पत्रकार परिषदेत फडणवीस बाजूला बसले होते व त्यांनी त्यावेळी न बोलणेच पसंत केले होते. त्यातही धोरणी मुत्सद्दीपणा होता. कारण त्यांनी ‘मातोश्री’बरोबरचा संवादाचा व्यक्तीगत पूल कायम ठेवला होता जो त्यांना त्याचवेळी नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कामाला आला होता.

सेना कायम सावध, मोदींच्या छायाचित्रांनाही विरोध

फडणवीस यांच्या पुढाकारानेच शिवसेना डिसेंबरमध्ये सत्तेत सहभागी झाली. भाजपाबरोबर राजकीय दुरावा निर्माण होऊनसुद्धा केवळ फडणवीस सरकारला मदत  हेच सेनेचे वर्तन राहिले. राजकीय दुरावा एवढा होता की त्यानंतर पाच वर्षात सरकारमध्ये काम करताना पक्ष म्हणून सेनेची भूमिका कायम स्वतंत्र राहिली. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे कायम सावध होते आणि सरकारवर टीका करण्यास ते आणि त्यांचे पक्षातील काही सहकारी कधी कचरले नाहीत. सेनेचा हा सावधपणा इतका जाणवणारा होता की, पाच वर्षांत सेना मंत्र्यांकडील खात्यांकडून दिल्या जाणाऱ्या जाहिरातींत अभावानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरले गेले आहे. सेनेकडील खात्यांच्या जाहिरातीत मोदींऐवजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेच छायाचित्र वापरण्याचा आग्रह सेना मंत्र्यांकडून केला जात असे. मोदींना हिंदुहृदयसम्राट मानण्यास सेनेकडून कायम विरोध झालेला आहे.

आपल्याला राजकीयदृष्ट्या दाबण्याचा आणि अवमूल्यन करण्याचा प्रयत्न होत आहे हे सेनेला जाणवत असावे म्हणून त्यांनी त्यांची हुशारी दाखवत कायम राजकीय पर्यायांवर काम केले. त्याची प्रचिती २०१९ मधील सत्तांतरात दिसून आली. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्यावर प्रेम करणारांना काय वाटते याचा विचार करून राजकीय चाली खेळल्या जात नसतात. ते कोणताच पक्ष करत नाही. उलट आपण घेतलेला निर्णय पक्षाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने हिताचा आहे की नाही याचाच विचार केला जातो. लोकांच्या गळी तो नंतर उतरवला जातो. रोजच्या जगण्यातील संघर्षात गुंतलेले लोक राजकीय हिशेब लक्षात ठेवत नाहीत आणि मतदानाच्या वेळी वेगळेच आडाखे असतात, याची पुरेपूर कल्पना नेत्यांनाही असते. म्हणूनच त्यांचेही सदैव बरे चाललेले असते.

२०१४ ते २०१९ या पाच वर्षांत सरकार चालवत असताना मुख्यमंत्री म्हणून फडणवीस आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा होता असे अजिबात म्हणता येत नाही. सेनेचे राजकीय स्वातंत्र्य शक्य तेवढे मान्य करतच सरकार चालत राहिले. फडणवीस आणि ठाकरे यांच्यात व्यक्तिगत संवाद उत्तम सुरू राहिला.

पुढे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सेनेला निव्वळ हव्या त्या जागाच दिल्या नाहीत तर उमेदवार सुद्धा (पालघरचे राजेंद्र गावित) सेनेच्या ओटीत घालण्याचे औदार्य (अर्थात मुत्सद्दीपणे) दाखविलेले होते. तरीही सेना काहींशी सावध होती. नंतर विधानसभेला आपल्याविरोधात काही तरी मोठा कार्यक्रम सुरू आहे याची जाणीव सेनेला होताच त्यांचे नेते सावध झाले आणि त्यांनी पर्याय पाहून ठेवला.

भाजपाच्या चाली पाहून सेनेचा निर्णय

आपल्याविरोधातील राजकीय चालींचा राग लक्षात ठेवून सेनेने पुन्हा फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील होण्यास सपशेल नकार दिला. इथे फडणवीस यांचे राजकीय अस्तित्व सैरभैर झाले. त्यामुळेच २०१९ पूर्वीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यात फार मोठा फरक पडला आहे. त्याचेच प्रतिबिंब आणि मनातील सल बहुधा खंजीर हा शब्द वापरून आणि ढाँचा खाली आणल्याशिवाय राहणार नाही, हा निर्धार व्यक्त करून फडणवीस व्यक्त करून दाखवत आहेत. बरेचसे फासे ते दिल्लीच्या मदतीने बरोबर टाकत आहेत असेही दिसून येत आहे. कारण आता सेना बऱ्यापैकी भांबावल्याचे दिसून येत आहे. अन्यथा हृदयात हिंदुत्व आणि हाताला काम अशी वाक्यरचना करत हिंदुत्वाशी आम्ही फारकत घेतलेली नाही हे दाखविण्याची गरज त्यांना वाटली नसती.

ठाकरेंच्या सभा पक्षप्रमुख म्हणूनच

त्याचबरोबर ठाकरे यांच्या सभाही पक्षप्रमुख म्हणून खुलासे करणाऱ्या जास्त आणि सरकारच्या कामगिरीबाबत आश्वासकतेचे शब्द कमी अशा दिसून आल्या नसत्या. तीन पक्षांच्या आघाडी सरकारचे नेते म्हणून त्यांच्या सभा वाटत नाहीत. मुख्यमंत्री म्हणून आघाडी सरकारची कामगिरी काय आहे यावर भर देताना ते दिसत नाहीत. आघाडीच्या विविध नेत्यांविरोधातील वादग्रस्त प्रकरणांची मालिका त्यांना बहुतेक बचावात्मक भुमिकेत घेऊन गेलेली दिसते.

दुसऱ्या बाजूला, सत्तेतील तीनही पक्षांत संभ्रम निर्माण केला की सरकारकडून मोठ्या चुका होतील आणि त्याचा लाभ आपल्याला होईल, असा भाजपाचा होरा दिसतो. परंतु जनमानस हे सर्व कशा पद्धतीने, कोणत्या अर्थाने घेते यावर त्यांचे यश अवलंबून राहणार आहे. जबाबदारीने फक्त सरकारनेच वागायचे असते आणि आपण विरोधक म्हणून कसेही वागलो-बोललो तरी चालते या भ्रमात न राहिलेलेच बरे. कारण आता जनमानस विचारी झाले आहे. राव करी ते गाव करी हे दिवस आता राहिलेले नाहीत.