दादासाहेब फाळके यांच्या नावे नृत्य व नाट्य संस्था नेतृत्व उर्मिला मातोंडकर यांच्याकडे ?

राज्यपाल कोट्यातील १२ सदस्य विधान परिषदेवर कधी नियुक्त होतील ते अद्याप अस्पष्ट आहे. मात्र त्यापूर्वी त्या यादीतील एक संभाव्य नाव अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याकडे एका नव्या संस्थेची जबाबदारी देण्याचा विचार शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करत असल्याची माहिती आहे. सरकारने याआधीच स्व. दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने एक आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठ परिसरात सुरू करण्याचे ठरविले आहे.

हे दोन्ही विषय सांस्कृतिक कार्य विभागाचे असले तरी त्याला राजकीय संदर्भ असल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभाग या संस्थांच्या उभारणीसाठी प्रचंड धावपळ करत आहे. शिवसेनेला या दोन्ही संस्थांचे संपूर्ण श्रेय हवे असून काँग्रेसच्या मंत्र्याकडे असलेल्या सांस्कृतिक कार्य विभागाऐवजी शिवसेना मंत्र्याकडे असलेल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या संस्था उभारणीसाठी जलद हालचाल करावी, असे सुरू आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने एक नृत्य व नाट्य संस्था सुरू  करण्याचा निर्णय लवकरच जाहीर करण्याची तयारी सरकारी पातळीवर सुरू आहे. त्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू असून ती संस्था कशी असावी यासाठीचा अभ्यासगटही कदाचित श्रीमती मातोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत यावर चर्चा झाल्याचे समजते.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे चिरंजीव पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे या संस्थेसाठी अनुकूल असून ती गोरेगाव चित्रनगरीच्या परिसरात असावी, यावरही चर्चा झाल्याचे समजते. हा निर्णय झाल्यास चित्रनगरीमध्ये नृत्यकला आणि नाट्यकला याची एक सर्व सुविधांनी युक्त एक संस्था आकाराला येईल. या संस्थेच्या इमारतीच्या आराखड्यासाठी एक आतंरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धाही आयोजित करण्याचा विचार सुरू आहे.

सध्या चित्रनगरी परिसरात नामवंत निर्माते व दिग्दर्शक सुभाष घई यांनी उभारलेली व्हिसलींग वूड्स ही संस्था सिनेमाशी संबंधित अभ्यासक्रम चालवते. या संस्थेबाबत प्रचंड मोठे वादंग झाले, कॅगचे ताशेरे आले, उच्च व सर्वोच्च न्यायालयानेही तत्कालीन सरकारवर ताशेरे ओढले. असे असले तरी मागे काँग्रेस नेतृत्वाखालील व नंतर भाजपा नेतृत्वाखालील सरकारने संस्थेला अभय देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आजही संस्था कार्यरत आहे.

फाळके यांच्या नावे उभारण्यात येणाऱ्या संस्थेचे संचालकपद श्रीमती मातोंडकर यांच्याकडे देण्याबाबतही विचार सुरू आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या मातोंडकर यांनी नंतर काँग्रेसचा त्याग करत शिवसेनेत प्रवेश केला. सेनेकडून त्यांचे नाव राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ सदस्यांच्या यादीत असल्याचे बोलले गेले. मात्र ही यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्य केलेली नाही. बहुदा त्यामुळेच त्यांच्याकडे नृत्य व नाट्यकला संस्थेची जबाबदारी देण्याचे ठरत असल्याचे म्हटले जाते.

या आधी महाविकास आघाडी सरकारने संगीतकलेचा शास्त्रशुद्ध अभ्यास, विकास, प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून स्व. दीनानाथ मंगेशकर यांच्या नावे आंतराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापनेचा निर्णय घेतला असून ते मुंबई विद्यापीठ परिसरात असेल. त्या संदर्भात सर्व बाबींचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली एक १४-सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत संगीत क्षेत्रातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक नामवंत आहेत.

या समितीच्या काही बैठका झाल्या आहेत. समितीची स्थापना यावर्षी जानेवारी महिन्यात करण्यात आली व तीन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र आठ महिने संपत आले तरी हा अहवाल अप्राप्त आहे.

अहवाल येईल तेव्हा येईल पण त्यामागे एक वेगळेच राजकारण सुरू आले आहे. महाविद्यालयाची उभारणी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने करावी की सांस्कृतिक कार्य विभागाने यावर खल सुरू आहे. शासनाच्या कार्यनियमावलीत संगीत हा विषय सांस्कृतिक कार्य विभागाकडे येतो आणि या खात्याचे मंत्रीपद काँग्रेसचे अमित देशमुख यांच्याकडे आहे. मात्र महाविद्यालयाचे संपूर्ण श्रेय शिवसेनेला हवे आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग सेनेचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे. त्यामुळे हे महाविद्यालय याच विभागाने उभारावे अशा हालचाली असल्या तरी त्यात तांत्रिक व नियम याबाबत काही अडथळे आहेत. या महाविद्यालयाची उभारणी मुंबई विद्यापीठ परिसरात व्हावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग जबाबदारी घेऊ शकतो, जमीन उपलब्ध करून देण्याबाबत सांगू शकतो. मात्र संगीत महाविद्यालयाची एकूणच रचना, प्रशासन, त्याबाबतचा तपशील हे सर्व सांस्कृतिक कार्य विभागाच ठरवू शकेल, असे सरकारमधीलच काहींचे म्हणणे आहे. यावर काय तोडगा निघतो, हे पाहणेही रंजक ठरणार आहे.