राणे यांचा शिवसेनेशी पंगा : काही अनुत्तरीत प्रश्न

राणेंच्या पाठीशी भाजपा खरंच आहे ?

मंगळवार दि. २४ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील पोलीस कारवाईच्या निमित्ताने राज्यभरात मोठा गदारोळ उठला. शिवसेना-नेतृत्वाखालील सरकारची भूमिका, राणे यांचे विधान यावरून सुरू झालेल्या चर्चेच्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्याप शांत झालेल्या नाहीत. एकूणच राणे यांचा भाजपातील प्रवेश, त्यांची व त्यांचे दोन सुपुत्र यांच्या कोकणातील राजकीय आखाड्यात शिवसेनेसोबत होणारी चकमक, टीका-टिप्पणी याची नेहमीच चर्चा होते. राणे कुठे बोलणार आहेत म्हटलं की ते सेनेवर काहीतरी शेलकी टीका करणार, टोमणे मारणार हे गेली अनेक वर्षे ठरलेले आहे. मग या सर्वांचा आताच कडेलोट का झाला असावा, हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

राणे पिता-पुत्रांना भाजपाने आपलेसे केल्यानंतर सेनेकडून स्पष्ट अथवा थेट टीका-टिप्पणी केली गेली नव्हती. भाजपाचा हा निर्णय योग्य की अयोग्य यावर सेना नेतृत्व कधी बोलले नाही. पण राणे यांना केंद्रात मंत्रीपद दिल्याबरोबर सेना अस्वस्थ झालेली दिसते. सत्तेचा चमत्कार आहेच तसा मुळी. सत्तेचे पद त्यातही मंत्रीपद म्हटले की खूप काही साध्य करता येते. केंद्रीय मंत्रीपद देऊन भाजपाने राणे यांचा मोठा सन्मानच केला. नाही तर राणे यांची राजकीय कारकीर्द राज्यसभा सदस्य एवढ्यापुरतीच मर्यादित राहून संपते की काय असेच बोलले जात होते.

राणेंना मंत्रीपद देऊन भाजपाने शिवसेनेला डिवचले. त्यावर सेनेकडून थेट प्रतिक्रिया आली नाही याचे कारण सेनेचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेत आहे. कोणतेही राज्य सरकार केंद्राशी फार पंगा घेऊ शकत नाही. केंद्राकडे असे अनेक विषय आहेत की त्यावर असहकार्याची भूमिका घेतली गेली की राज्याची दमछाक होऊ शकते. केंद्रीय अन्वेषण संस्था (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालय (ईडी), आयकर विभाग (इन्कम टॅक्स) या तर इतर बाबी झाल्या.  पण वस्तू व सेवा कर (जीएसटी) पासून ते अन्य केंद्रीय करातील वाटा, केंद्र सरकार सहाय्यीत प्रकल्प यावर दिल्लीतून डोळे वटारले गेले तर राज्य सरकार स्वतःच्या बळावर विकासाच्या योजना पुढे रेटू शकत नाही. एवढेच काय जागतिक वित्तीय संस्था केंद्राच्या संमतीशिवाय राज्याला मदत करू शकत नाहीत.

बहुधा त्यामुळेच सेनेचे नेतृत्व राणेंना मंत्रीपद मिळाल्यावरही शांत राहिले. पण जेव्हा राणेंनी त्यांच्या टिकेची धार वाढविली तेव्हा सेना घायाळ होऊ लागली. आधीच मंत्रीपद अन त्यात टीका या दोन्हींचा संयोग झाल्यामुळे सेनेला आपले अस्तित्व दाखवून द्यावेसे वाटलेले दिसते हे उघड आहे. त्यांनी मंगळवारी केलेला हंगामा हा अतिशय नियोजनपूर्वक आखलेल्या योजनेचा भाग होता. त्यात सेना भाव खाऊन गेली हे नाकारता येणार नाही. पण आपण यामुळे मुळीच घाबरणार नाही, हे  दाखवत राणे तोंडाचा दांडपट्टा अधिक वेगाने फिरविणार असेच संकेत देत आहेत.

पण या घडामोडींदरम्यान काही प्रश्न निर्माण होतात ते असे-

  • राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेत चिपळूणपासून निर्माण झालेल्या कडव्या संघर्षात आशिष शेलार, सुनिल कर्जतकर, प्रसाद लाड, प्रमोद जठार वगळता फारसे प्रमुख चेहरे सोबत दिसले नाहीत. त्यांनी त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेला सुद्धा वरिष्ठ नेत्यांपैकी कोणी गेले नाही.
  • राणेंच्या भेटीसाठी रामदास आठवले वगळता एकही केंद्रीय मंत्री गेला नाही.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा किंवा जे. पी. नड्डा यांनी दूरध्वनीवरून त्यांची विचारपूस केली अशी काही बातमी नाही. त्यांचे मंत्रीमंडळातील कोणी सहकारी विचारपूस करताना दिसले नाहीत.
  • त्या घटनेनंतर त्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भेटल्याची वा विचारपूस केल्याची बातमी नाही.
  • मंगळवारी सर्व घटना घडत असताना फडणवीस दुपारी पत्रकारांसमोर आले. त्यांनी तर जन आशिर्वाद यात्रा थांबणार नाही असे सांगितले. ही यात्रा प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत सुरू राहील, असे त्यांनी जाहीर केले. लगोलग दरेकर मुंबईहून रत्नागिरीला निघाल्याच्या बातम्याही समाजमाध्यमांवर आल्या. मग पुढे काहीच झाले नाही. त्यांच्यासोबत आशिष शेलार व प्रमोद जठार ही यात्रा पुढे घेऊन जाणार होते.
  • मग राणे यांच्याबाबतीत काय सुरू आहे? त्यांना नैतीक पाठबळ दिल्याचे कसे दिसणार ?
  • फडणवीस यांनी भाजपा राणे यांनी केलेल्या विधानाच्या पाठीशी नाही पण त्यांच्या पाठीशी आहे असे विधान केले. राणे यांनी आपले विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कितवा स्वातंत्र्यदिन आहे हे ही माहिती नाही या संदर्भात होते आणि आपण तिथे असतो तर… असे म्हटले होते. मी थोबाडीत मारीन असे आपण म्हणालोच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या स्पष्टिकरणाला भाजपाचा पाठिंबा आहे, हे जाहीर झालेले नाही.
  • एकेकाळी राणे यांच्यासोबत मंत्रीमंडळात काम केलेले आणि आज भाजपात असलेले त्यांचे जुने सहकारी राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील आदी त्यांना भेटलेले नाहीत किंवा त्यांच्या सोबतही दिसत नाहीत. 
  • आता राणे यांनीच ही यात्रा पुढे सुरू केली आहे. त्यांची वक्तव्ये पाहता ते स्वतःवर आवर घालणार नाहीत, असेच दिसून येत आहे. यापुढे त्यांनी केलेल्या प्रत्येक विधानाच्या पाठीशी भाजपा असणार नाही, अशी भूमिका भाजपा पुन्हा जाहीर करणार की शांत राहणार.
  • शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न. भाजपाच्या अनेक कार्यालयांवर दगडफेक करून नासधुस करण्यात आली. याबाबत गुन्हे दाखल झालेत का, याची खात्री भाजपाने केली? नसल्यास भाजपाची भूमिका काय?

या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे हे नक्की!