राज ठाकरे-भाजपा जवळीकीसाठी जैन मुनींचा सेतू?

मुंबई महानगर क्षेत्रातील सुमारे १८ लाख मतांवर ज्यांचा थेट प्रभाव आहे असे जैन मुनी नयपद्मसागर महाराज यांनी मंगळवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी भेट दिली.   तिथे त्यांनी सुमारे तीन तास सामाजिक, राजकीय आणि धार्मिक मुद्द्यांवर चर्चा केल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. आपण राज ठाकरे यांना शुभाशिर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलो असून त्यांचं नव्या घरातील वास्तव्य चांगलं असावं यासाठी शुभेच्छा द्यायला आलो आहे, असे महाराज म्हणाले.

वरवर पाहता ही गोष्ट तितकीशी साधी, सरळ, सात्विक नाही. मागील काही घडामोडींचा परामर्ष घेतला तर हे लक्षात येईल.  

राज ठाकरे अलीकडेच त्यांच्या नव्या घरात राहण्यास गेले आहेत. गृहप्रवेश करताना त्यांनी यथासांग पूजाअर्चा केली. पण वास्तूशांतीचे औचित्य साधून नातलग आणि जवळच्या लोकांना बोलावून जेवणावळ आयोजित करण्याचा सर्वमान्य कार्यक्रम त्यांनी केलेला दिसला नाही. तो केला असता तर चुलतभाऊ आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व कुटुंबिय, इतर नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील जवळचे मित्र यापैकी कोण-कोण निमंत्रित केले गेले आणि कोण हजर राहिले याची चर्चा झाली असती. नाही म्हणायला कोरोनाचे निमित्त होतेच.

कदाचित त्यांच्या मनात दुसरेच असावे. मोठा कार्यक्रम करण्यापेक्षा निवडक मित्र व इतर मान्यवरांना बोलावून घर दाखवण्याचा त्यांचा मानस दिसतो. बहुदा  त्याचा भाग म्हणून की काय विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब त्यांच्याकडे अलीकडेच जाऊन आले. फडणवीस यांच्या भेटीनंतर बऱ्याच बातम्या आल्या. भाजपा आणि मनसे यांच्यात काही राजकीय गुफ्तगु सुरू आहे असा त्या बातम्यांचा सूर होता. त्या विरतात न विरतात तोच आता नाव आले ते थेट नयपद्मसागर महाराज यांचे.

महाराज जीओचे संस्थापक

जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन (जीओ) या अतिशय ताकदवान संघटनेचे संस्थापक म्हणून नयपद्मसागर महाराज ओळखले जातात. ही संघटना ताकदवान यासाठी की मुंबई आणि महानगर परिसरातील अतिशय शक्तीमान असे बिल्डर, बडे कंत्राटदार, हिरे व्यापारी, भांडवलदार, शेअर बाजारातील बडे दलाल प्रामुख्याने ज्या जैन समाजातून येतात त्यांची ही सर्वोच्च संस्था आहे. असे म्हटले जाते की ही संस्था आपल्या अंकित असावी यासाठी अनेक तगडे राजकारणी प्रयत्नशील असतात.

मोठी उलाढाल असलेल्या व्यवसायात अग्रेसर असलेल्या जैन समाजावर या संघटनेचा मोठा प्रभाव असल्याने व हा समाज नयपद्मसागर महाराज यांना प्रचंड मानत असल्याने त्यांचा १८ लाख मतदारांवर थेट प्रभाव असल्याचे म्हटले जाते.  

पर्यूषण पर्वात पशू-पक्षी यांच्या कत्तलीवर बंदी घालावी अशी मागणी ते सातत्याने करत असतात. भाजपाचे सरकार असतानाही मुंबई महानगरपालिकेने पर्यूषण पर्वातील कत्तलीवरील दोन दिवसांची बंदी उठविल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मांसाहार मुक्त समाज या मागणीसाठी ते सतत आग्रही असतात.

शिवसेनेशी पंगा

२०१५ मध्ये मीरा-भायंदर महानगरपालिकेने कत्तलीवरची आठ दिवसांची बंदी उठविल्याबद्दल फार मोठे वादंग झाले होते. त्यानंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत महाराजांनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केल्यामुळेच भाजपाला ९५ पैकी ६१ जागा मिळाल्याचे म्हटले गेले. त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला आणि त्यांच्या केवळ २२ जागा आल्या. भाजपाला मतदान करण्याचे आवाहन उघडपणे केल्याबद्दल सेनेने महाराजांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती.

त्यावेळी सेनेकडून त्यांच्यावर तीव्र शब्दात हल्ले करण्यात आले होते. भाजपाने या निवडणुका ‘मनी आणि मुनी’ यांचा वापर करून जिंकल्याचा आरोप सेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला होता. राजकीय गुंड अशी त्यांची संभावना करत राऊत यांनी त्यांची तुलना वादग्रस्त मुस्लीम धर्म प्रचारक झाकीर नाईक यांच्याशी केली होती. हे दोघेही धर्माच्या नावावर बेकायदेशीर फतवे जारी करतात असे सांगून त्यांनी भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली होती.  

शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेनेही पर्यूषण पर्वातील चार दिवसांची कत्तलीवरील बंदी दोन दिवसांवर आणल्याबद्दल महाराजांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मीरा भायंदर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर शिवसेनेने केलेल्या आरोपानंतर आपण व्यथित झालो असल्याचे त्यांनी म्हटले होते.

भाजपाला उघडपणे मदत केल्याचे आरोप फेटाळताना त्यांनी आपल्या देशात प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाकाहारी जीवनपद्धतीचा पुरस्कार केल्याने आपण प्रभावित झालो. त्यामुळेच आपण भाजपाला पाठिंबा दिला. तसेच आपण कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

या संपूर्ण पार्श्वभूमीवर नयपद्मसागर महाराज यांची मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या निवासस्थानाला दिलेली भेट आणि तेथे सुमारे तीन तास सामाजिक, धार्मिक आणि राजकीय विषयांवर चर्चा केल्याचे त्या पक्षाकडूनच सांगण्यात येणे, या गोष्टी सरळ, साध्या नसतात.

महाराज भाजपाच्या पाठीशी

नयपद्मसागर महाराज भाजपाच्या पाठीशी असल्यानेत २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ८२ जागी त्यांचे नगरसेवक निवडून आले. यात जैन आणि अन्य गुजराती समाजाचा मोठा सहभाग होता, हे लपून राहिलेले नाही. या निवडणुकीला काही दिवस असताना तेव्हा मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस नयपद्मसागर महाराजांना भेटले होते. महाराजांनी भाजपाला विजयी होण्याचे आशिर्वाद दिले होते, अशी चर्चा होतीच. शिवाय अलीकडेच मे महिन्यात फडणवीस यांनी महाराजांची भेट घेतल्याचे ट्वीट छायाचित्रांसह केले होते.

शिवसेनेशी प्रचंड बिनसलेले महाराज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी जातात आणि आशिर्वाद देतात ही गोष्ट शिवसेना नजरेआड करू शकेल असे वाटत नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना आणि पाठोपाठ ठाणे, नवी मुंबई, पुणे महापालिका निवडणुका येत असताना ही गोष्ट दुर्लक्षित करण्यासारखी अजिबात नाही.

भाजपाला नव्या मित्राची गरज

आज राज्याच्या राजकारणात भाजपाकडे मोठा मित्र कोणीही नाही. २०१९ पूर्वी सोबत असलेले महादेव जानकर, राजू शेट्टी सोबत नाहीत. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीशी टक्कर देत असताना भाजपाला राज ठाकरे यांची आवश्यकता भासत आहे. वरवर दाखवले जात नसले तरी भाजपाकडून या आधी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष आशिष शेलार भेटलेले आहेत.

आज मनसेलाही काहीशा मर्यादा आल्याचे दिसून येत आहे. त्या का आल्या हे सर्वांना माहिती आहे. त्यावर कथ्याकूट करण्यापेक्षा पुढे काय करता येईल आणि लवकरच होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांत काय कामगिरी करता येईल, याकडे या पक्षाचे लक्ष असणार.

या संपूर्ण पार्श्वभूमीवर नयपद्मसागर महाराज राज यांच्या घरी तीन तास काही उगाच देऊ शकत नाहीत. महाराजांची उघड राजकीय भूमिका आणि शिवसेना विरोध पाहता ते भाजपा आणि मनसेची मोट बांधण्याकामी मोठी भूमिका बजावत आहेत, हाच या भेटीचा अर्थ आहे. अर्थात मनसे भाजपासोबत उघड-उघड युती करेल का हा एक मोठा विषय आहे. कारण याचे राजकीय पडसाद अनेक अर्थांनी उमटू शकतात. मनसेच्या उत्तर भारतीय विरोधातील आंदोलनांचा इतिहास पाहिला तर भाजपाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागू शकतात. मराठी मतांवर मदार असलेले राज भाजपासोबत उघड युती करण्याबाबत साशंक असावेत. भाजपासोबत मैत्री करण्याबाबत त्यांच्याकडून संकेत दिले जात नाहीत. मग महाराज कदाचित हा संवादसेतू अधिक बळकट करण्यासाठी तर गेले नसावेत, असे वाटण्यास जागा आहे. त्याऐवजी वेगळ्या पद्धतीने राजकीय समझोता करण्याचा प्रयोग जरी जमून आला तरी मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका निवडणुका रंगतदार होऊ शकतात. त्याचा भाग म्हणून भाजपाने मनसेचे उमेदवार असलेल्या ठिकाणी फारसा जोर न लावणे, प्रसंगी उमेदवार न देणे आणि त्याची परतफेड मनसेने तशाच पद्धतीने करणे हे होऊ शकते. तसे झाले तरी ते शिवसेना आणि मित्रपक्षांना नक्कीच जड जाऊ शकते.