राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यात साम्य काय?

महाराष्ट्रातल्या सत्तांतराबाबत अनेक पैलू सांगण्यासारखे आहेत. पहिली गोष्ट अशी की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शरद पवार यांना नेता मानतात. बंडखोर गटाला सुप्रिया सुळे यांचा वावडे दिसते आहे. मग याची तुलना राज ठाकरे यांच्या मार्च २००६ मधील निर्णयाशी करावी लागते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना “माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे”, असा आरोप केला होता. ते आपले चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होऊन बाहेर पडले होते.

मग अजित पवार यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह भाजपा-शिवसेना यांच्या सरकारमध्ये सामील होत असताना घेतलेल्या निर्णयाचा संबंध सुप्रिया सुळे यांच्याशी संबंधित आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण सोमवारी दुपारी प्रफुल पटेल आणि अजित पवार यांनी आमचाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा दावा करत नवी रचना जाहीर केली त्यात पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवार यांचे नाव आवर्जून घेतले पण अलिकडेच राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्त झालेल्या सुप्रिया सुळे यांचे नाव वगळले. वावडे त्यांच्याच नावाचे आहे काय, असा प्रश्न यातून तयार झाला.

संघर्ष शरद पवार यांच्याशी नाही

अजित पवार यांना शरद पवार यांच्याशी थेट संघर्ष करायचा नाही. उलट तेच आपले नेते आहेत असे आवर्जून सांगायचे आहे. राज ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कसलाही संघर्ष असल्याचे दाखवले नव्हते. त्यांचा संघर्ष उद्धव ठाकरे यांच्याशी होता. अशा रितीने महाराष्ट्रात साधारणपणे १७ वर्षांच्या अंतराने एक साधर्म्य दाखविणारी महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडलेली आहे.

तसेच भाजपाच्या आशिर्वादाने गतवर्षी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठी फूट पडून ४० आमदार बाहेर पडत सत्तांतर झाले. आधी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि नंतर शरद पवार यांच्या नावाशी निगडीत ताकदवान ब्रँड तयार झालेल्या राष्ट्रवादीत पक्षात फूट पडेल अशी व्यवस्था तयार केली गेली. याबाबत भाजपाला वेगळ्या अर्थाने दाद द्यावी लागणार आहे.

पडद्यामागे बरेच काही

दुसरी गोष्ट शपथविधी झाला त्यानंतर मंगळवार उशीरापर्यंत खातेवाटप जाहीर झालेले नाही. साधारणपणे कुठल्याही सरकारमध्ये इतर पक्षातले लोक सहभागी होतात, तेव्हा खातेवाटप ठरल्याशिवाय शपथविधीच होत नाही. कारण सरकार मध्ये सहभागी झाल्यावर आमची भूमिका काय असेल अशी विचारणा किंवा खात्री केली जाते. म्हणजेच याचा अर्थ असा की सारे काही आलबेल नाही. त्याचबरोबर बंडखोर राष्ट्रवादीच्या गटाबरोबर नेमके किती आमदार आहेत आणि ते कोण आहेत ही बाब अद्याप स्पष्ट होत नाही. अशी यादी जाहीर करणे अजित पवार किंवा प्रफुल पटेल यांनीही टाळलेले आहे. म्हणजेच आमदार कोण कोण येऊ शकतात याची चाचपणी अद्याप सुरूच आहे. मग हे बंड यशस्वी झालं असं कशावरून म्हणायचं? म्हणूनच की काय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून अभिनंदन पर ट्विट सुद्धा झालेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फार खुललेले दिसत नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अजित पवार यांच्या समावेशानंतर प्रसिद्धी माध्यमांसमोर येणे टाळलेले आहे. अजित पवार आणि त्यांचे सहकारी आपली भूमिका अधिक स्पष्टपणे उघड करण्यास तयार दिसत नाहीत. म्हणजेच राज्यामध्ये एवढा मोठा भूकंप होऊन सुद्धा ना ज्यांचा लाभ झालाय ते आनंदात दिसत नाहीत किंवा ज्यांचा लाभ होण्याची शक्यता आहे ते उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.

राष्ट्रवादीत उल्हास किती हाही प्रश्नच!

राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे आमदार दूरवरून या सगळ्या घडामोडींचे अवलोकन करत आहेत असेच दिसून येते. राज्यामधली राजकीय परिस्थिती अजूनही स्पष्ट होत नाही. एक बाब मात्र खरी की राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे हा सुप्त संघर्ष या निमित्ताने अधिक स्पष्ट दिसून येतो. अजित पवार यांची राजकीय अडचण अशी आहे की उद्या जेव्हा ते निवडणुकीमध्ये प्रचारासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यावतीने बाहेर पडतील तेव्हा ते कोणावर टीका करतील हा मोठा प्रश्न आहे. अडीच वर्षे ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं त्या उद्धव ठाकरेंवरती टीका करू शकतील? ज्या काकांच्या विरोधात त्यांनी बंड केलं त्या शरद पवारांवर ते टीका करू शकतील? ज्या काँग्रेस सोबत त्यांनी अडीच वर्ष सरकारमध्ये सहभाग घेतला त्यांच्यावर ते टीका करू शकतील? मग त्यांचे लक्ष्य नेमके कोण असेल आणि त्याचा भाजपला नेमका काय फायदा होणार हे प्रश्न निर्माण होतात.

महाराष्ट्राचे राजकारण एका अत्यंत अनाकलनीय टप्प्यावर

या राजकारणात पुढे कसे कसे रंग भरत जातात हे पाहणे मोठेच औत्सुक्याचे आहे. स्वतः अजित पवार आणि त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे एकनाथ शिंदे यांचे कनिष्ठ सहकारी बनले आहेत. जे शिंदे २०१४ ते १९ या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात तर २०१९ ते २०२२ दरम्यान  अजित पवार महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री असताना शिंदे हे एक मंत्री होते.

मोठी अजब गोष्ट यानिमित्ताने घडत आहे यापुढे भाजपा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्यासोबत आलेला राष्ट्रवादीचा गोतवळा यांचे हे सरकार कशा पद्धतीने काम करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून खरेच समाधानी राहतील का, त्यांना आपली ही राजकीय परिस्थिती आणि मिळालेली पद मान्य आहेत का, तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये आपले जे काही राजकीय प्रतिस्पर्धी उरले आहेत, त्यांच्यावर ते कशी मात करतील हे पाहणे रंजक असणार आहे.

फाटाफूटीला विलंब अनाकलनीय

विशेष म्हणजे कोणत्याही महत्त्वाच्या राजकीय घडामोडीमध्ये ज्याचा संबंध पक्षाच्या फाटाफुटिशी असतो त्या वेळेच्या घडामोडी ह्या अत्यंत वेगवान असतात. एखादा पक्ष फुटला आणि त्यातील काही सदस्यांनी सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला की सत्ताधारी पक्ष त्यांच्या गटाला ताबडतोब सरकारमध्ये घेतोच. शिवाय त्याची रीतसर यादी राजभवनला देऊन ती प्रसिद्ध केली जाते. मंत्रिमंडळात समावेश करायचा असेल तर तो तात्काळ केला जातो.

याशिवाय या सदस्यांच्या गटावर त्यांच्या मूळ पक्षाकडून काही कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे या बंडखोर गटाला स्वतंत्र गट म्हणून तात्काळ मान्यता देण्याची विनंती केली जाते. याआधी जेव्हा जेव्हा पक्षामध्ये फूट पडली तेव्हा तेव्हा विधानसभेच्या अध्यक्षांनी त्या त्या गटाला तात्काळ मान्यता दिल्याची उदाहरणे आहेत. एकदा का अध्यक्षांनी अशा फुटीरगटाला वेगळा दर्जा दिला आणि मान्यता दिली की त्याला कुठेही पुन्हा आव्हान देता येत नाही.

पवारांची तात्काळ हालचाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला अधिकृत राष्ट्रवादी पक्ष अशी मान्यता देण्याच्या काही हालचाली सुरू होण्याआधीच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या नऊ सदस्यांना अपात्र ठरवावे अशी याचिका अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे तात्काळ दाखल केली.

ही याचिका दाखल केल्यामुळे त्या नऊ सदस्यांच्या बाबत स्वतंत्र निर्णय अध्यक्षांना घ्यावा लागेल. त्यानंतर कितीही आमदारांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा विचार स्वतंत्रपणे करावा लागेल. अशी वेळ बहुदा येण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या घडामोडी कायद्याच्या कसोटीवर पारखल्या जाणे क्रमप्राप्त ठरणार आहे ही घाई रविवारी का करण्यात आली नाही, याला अद्याप समर्थनीय कारण दिले जात नाही. तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे किती आमदार एकत्र आहेत याबाबत पुरेशी स्पष्टता येत नाही त्यामुळे राज्यातला सत्तेचा खेळ अतिशय रंगतदार ठरतोय हे नक्की.

—————————————————————————————