महाराष्ट्रात आता उणीदुणी आणि जुनी धूणीचा काळ

रविवारी ५ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांची खेड (जि. रत्नागिरी) येथील सभा झाल्याबरोबर त्याला उत्तर देणारी सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १९ मार्च रोजी घेतील, असे जाहीर झाले आहे. म्हणजेच ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीने उत्तर देणार, त्यावर पुन्हा ठाकरे यांच्या वतीने उत्तर दिले जाणार.

महाराष्ट्रात सध्या एकामेकांची उणीदुणी काढत जुनी धूणी सार्वजनिकरित्या धुतली जात आहेत. तुम्ही आमच्याबद्दल काही शेलकं बोलाल तर आम्ही पण बोलू, असा हा सारा सध्याच्या राजकारणाचा रोख आहे. एकामेकांकडे पाहून राजकारणाचे अजेंडे ठरवले जात आहेत.

मागे एकदा उद्धव ठाकरे म्हणाले होते की आपण जर उणीदुणी काढत बसलो तर जनता माफ करणार नाही. हे विधान त्यांनी मुख्यमंत्री असताना केलं होतं. पण सध्याचं राजकारण इतकं गढूळ झालं आहे की त्याला सवंगतेची कोणती व्याख्या लावावी हा प्रश्न पडावा. महाराष्ट्राचं राजकारण या पातळीवर कधी गेलं नव्हतं. तुम्ही तेव्हा कसे वागलात, मी कसं वागलो, मी कशी तुम्हाला मदत केली, तुम्ही कसे माझ्याकडे आला होतात अशा स्वरूपाची ही भाषा महाराष्ट्राचा उज्वल भविष्यकाळ निश्चितच सांगत नाही.

परवा खेडची सभा संपल्यानंतर माजी मंत्री रामदास कदम यांची आगपाखड महाराष्ट्राच्या कानावर पडली. मला मागे कसं दुय्यम खातं दिलं गेलं, माझ्याकडे भास्कर जाधव कसे लोटांगण घालून गेले आदी आदी ते बोलले. उद्धव ठाकरे बोलले की एकनाथ शिंदे समर्थक आमदारांकडून चवताळून प्रतिक्रिया येते. शिंदे काही बोलले की त्यावर तशीच प्रतिक्रिया येते. त्यानंतर भाजपाकडून समाजमाध्यमावर सक्रीय असलेली मंडळी तुटून पडतात.

देमार चित्रपटांचे स्वरूप

एकूणच हा काळ १९७० आणि १९८० च्या दशकांतील बहुसंख्य हिंदी चित्रपटांच्या कथानकासारखा आहे. मैं बदला लूंगा, मैं तेरा खून पी जाऊंगा, मैं तेरी खाल निकालूंगा असे सडकछाप संवाद आणि तशा आशयाचे शिर्षक असलेले चित्रपट त्यावेळी गल्ला चांगला जमवत. तसेच स्वरूप आताच्या राजकारणाला आले आहे. फक्त भाषा थोडीशी वेगळी आहे.

याआधी महाराष्ट्रात सर्वात सणसणाटी असे राजकीय स्थित्यंतर १९७८ मध्ये झाले. इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांचे सरकार जाऊन शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. त्यासाठी पवार यांना बंड करावे लागले आणि वसंतदादा यांचे मुख्यमंत्रीपद काढून घ्यावे लागले. दादांचे जनमानसातील स्थान चांगले होते. त्यांची प्रतिमा पक्षसंघटना आणि जनमानस यात चांगली होती. त्यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेणे अनेकांना रुचले नाही. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून पवारांनी मुख्यमंत्रीपद मिळविले असा आरोप वर्षानुवर्षे पवारांना चिकटला.

सत्तांतर होताच सांगलीचे अनेक पैलवान मुंबईत आले. दादांचे मुख्यमंत्रीपद गेल्याने प्रक्षुब्ध झालेले हे पैलवान संतप्त झाले होते. ते काही आताताई भूमिका घेण्याच्या तयारीत दिसताच दादांनी त्यांना ‘राजकारणात असे चालायचेच’ असे सांगत शांत केले म्हणतात. त्यामुळे अनेक अवावस्था प्रसंग टळले असे म्हटले गेले.

वैयक्तिक हितसंबंध, बदला ही भावना प्रबळ

जनतेला केंद्रस्थानी ठेवून राजकारण करण्याचा तो काळ होता. आताचा काळ ‘मी, माझे, मला’ हा आहे म्हणून सारा प्रश्च निर्माण झाला आहे. यात लोकांना काय मिळतेय हा भाग दुय्यम झाला आहे. तसे नसते तर मागील सरकारच्या काळात जनहिताच्या योजनांना मिळालेला निधी थांबवून कामे बंद पाडण्याचे प्रकार झाले नसते. त्याविरोधात लोक न्यायालयात गेले आणि न्यायालयाने सरकारला चपराक लगावली. सरकार जणू खासगी मालमत्ता आहे असे वागण्याचा हा काळ आहे.

याला कोणी एक पक्ष वा विशिष्ट असा नेता जबाबदार नाही. लोकांना केंद्रस्थानी ठेवून चालवल्या जाणाऱ्या लोकशाहीच्या या दुधाच्या कलशात सर्वचजण यथेच्छ पाणी टाकत आहेत. त्याचे पुढचे स्वरूप काय असेल याची कल्पनाही करवत नाही.

आज महाराष्ट्राची एकूण काय परिस्थिती आहे. सामाजिक वीण किती विस्कटून गेली आहे. मध्यमवर्गीय, बेरोजगार, महिला, शेतकरी यांचे प्रश्न काय आहेत, त्याबाबत काय करता येईल यावर विचार करण्याबाबत फारसे कोणी गंभीर दिसत नाही. एखादी समस्या अंगावर आलीच तर त्यावर काहीतरी तात्पुरती मलमपट्टी करा व माझी सुटका करा, असे सांगण्याचा हा काळ आहे.

कुरघोडी करण्यासाठी जहाल शब्द वापरा, करेक्ट उपमर्द कसा होईल अशी भाषा वापरा, शेलकी विशेषणे वापरा असा हा काळ आहे. यातून आपण काय पेरतोय आणि त्यातून काय उगवणार आहे, त्याला कशी कटू, विषारी फळे येणार आहेत याकडे पाहण्यास कोणाला उसंत नसावी हे अधिक भीषण आहे. समाजमाध्यमांवरील पगारी टोळ्यांची भाषा तर फारच चिंताजनक आहे.

मागे वळून पाहण्याची तसदी घेतली जात नाही

राजकारण ही विचारांची लढाई असते हा विषय पूर्णपणे संपलाय असे वाटावे असा हा काळ आहे. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री. त्यांच्या विरोधात अनेक अविश्वास प्रस्ताव आले. त्यांच्यावर अनेकदा गंभीर आरोप झाले. वैयक्तिक आरोपही झाले. त्याला त्यांनी कशी संयत उत्तरे दिली. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीत सर्वाधिक कसोटीचा काळ १९९३ ते ९५ हा होता. त्यावेळी त्यांच्यावर कसे आरोप झाले आणि त्यांनी त्याचा कसा सामना केला याकडे जरा पाहण्याची गरज आहे. भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. त्यांनी त्यांच्यावर कसे हल्ले चढविले आणि ते पवार यांनी कसे परतवून लावले यावर आजच्या उथळ नेत्यांचा क्लास घेण्याची प्रचंड आवश्यकता वाटते.

शिवसेना ही नेहमीच रस्त्यावर लढणारी संघटना म्हणून ओळखली गेली. या संघटनेतील बहुसंख्य नेत्यांची जडणघडण रस्त्यावर आंदोलने करून झाली. पण एककीकडे त्यांच्याकडे मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, अधिक शिरोडकर अशी नेमस्त मंडळीही होती. आता फाटाफुटीमुळे सगळाच आनंदीआनंद झाला आहे. भाजपाला नेहमीच सेनेच्या पुढे जाण्याची इच्छा होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांनी यासाठी नेटाने प्रयत्न सुरू केले. त्याचा राजकीय पद्धतीने सामना करणे हा ज्याचा त्याचा अधिकार होता आणि आहे. पण जसजसे जुने-जाणते नेते मागे पडले तसे या लढाईत कोण कोणाच्या कमरेचे सोडून डोक्याला बांधतोय याला सुमार राहिलेला नाही.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आपले वेगळेपण जपू शकली असती पण सध्याच्या प्रवाही राजकारणात टिकून राहायचे असेल तर तुम्हालाही आक्रमक (हा फारच सभ्य शब्द झाला) व्हावे लागेल असे वाटू लागल्याने कोणीही अपवाद राहिला नाही. महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे होते तोवर भाषा, वर्तणूक याकडे बारीक लक्ष दिले गेले. आता तिथेही सगळा आनंदी आनंद आहे. एकूणच काय तर आपण रस्त्यावर नाही उतरलो, थेट रस्त्यावर वापरतात तशी भाषा नाही वापरली तर मागे पडू ही राजकीय क्षेत्राला वाटणारी खंत प्रचंड भयावह आहे. लोकशाही व्यवस्था स्वीकारताना आपल्या इतिहासपुरुषांनी किती उदात्त व भव्य स्वप्न पाहिली होती आणि हे काय होऊन बसले आहे याची कल्पनाही करवत नाही.