काँग्रेसचा गोंधळ, दिल्लीत अन गल्लीतही सारखाच

अलीकडेच उदयपूर येथे पार पडलेले चिंतन शिबीर आणि त्यात राहुल गांधी यांनी प्रादेशिक पक्षांवर मारलेले ताशेरे यामुळे काँग्रेस पक्ष सध्या चर्चेत आहे. प्रादेशिक पक्षांवर केलेल्या टिप्पणीचा तात्काळ खुलासा करण्याच्या घाईत राहुल थेट लंडनमध्ये असताना बोलून मोकळे झाले. भारतात परतून त्यावर सविस्तर बोलता आले असते. पण आले राहुलजींच्या मना तेथे कोणाचेच चालेना, अशी काँग्रेसजनांची अवस्था झाली आहे.

काही का असेना सध्या काँग्रेसबद्दल लिहिले, बोलले जात आहे. कारण हा पक्ष त्याच्याही पलीकडे गेला होता. त्यावर कोणी बोलावयास तयार नव्हते इतकी या पक्षाची वाईट अवस्था झालेली आहे.    

निष्ठेपासून निसटलेल्यांची काँग्रेसमध्ये गर्दी झाली आहे, असे ६० आणि ७० च्या दशकांत सक्रीय राहिलेले थोर गांधीवादी आणि सच्चे काँग्रेसी बाळासाहेब भारदे म्हणाल्याचे लोक सांगत. हे वाक्य पुढे खरे ठरत गेले आणि पक्षाच्या अधोगतीला वेगच आला. पण असाही काळ लोकांनी पाहिलेला आहे की, काँग्रेसचा विरोधक काँग्रेसचे असे. कारण विरोधी पक्षांची ताकद तोळामासा होती व ते एकत्र येणेच कठीण होते.

अशा वेळी काँग्रेसची नेतेमंडळी आपापल्या समर्थकांना एकामेकांविरोधात वापरून घेत. बंडखोरी करायला लावून निवडणुकांमध्ये उलथापलथ घडवित. प्रसंगी सोयीचा विरोधक निवडून आणत आपल्याच पक्षाच्या एखाद्या नेत्याचा बंदोबस्त करीत.

आपल्याला विरोधकच नाही असे म्हटल्यावर काँग्रेसमध्ये व्यक्तीस्तोम माजले व हा यांचा, तो त्यांचा समर्थक म्हणून ओळखला जाऊ लागला. पक्षापेक्षा व्यक्तीच्या नावावर अनुयायी ओळखले जाऊ लागले. पक्षापेक्षा नेता श्रेष्ठ ठरू लागला तिथेच खरा काँग्रेसचा ऱ्हास सुरू झाला.

विरोधी कमकुवत म्हणून फावले

खरे तर विरोधी पक्षांनी स्वतःवर घालून घेतलेल्या मर्यादा किंवा कचखाऊ वृत्ती यामुळे काँग्रेसचे फावत गेले. विरोधी पक्षातील काही लोकांना विधान परिषद, राज्यसभा व्यवस्थित मिळे. संख्याबळ कमी असतानाही ते कसे काय होते बुवा याचा विचार करेपर्यंत विरोधी पक्ष आणखी क्षीण झालेला असे. नवी पिढी न घडविल्यामुळे ७०-८० च्या दशकात काहीसा प्रभाव असेलेल्या विरोधी पक्षांची आजची अवस्था काय आहे हे पाहिले की, याचे उत्तर लक्षात येते. ते पक्ष आज आपल्या कार्यालयाला रंगरंगोटी करायला महाग आहेत.

काँग्रेस वा अन्य प्रभावी प्रादेशिक पक्षातील एखादा नेता या पक्षांच्या कार्यालयांची  डागडुजी करून देतो. माझे वडील, काका काँग्रेस नेतृत्वावर नाराज होऊन काही दिवसांसाठी तुमच्या पक्षात आले होते. त्यावेळी तुम्ही चांगले सहकार्य केले होते, असे म्हणत त्यांचा वारस हे काम करून देत असतो.

विरोधी पक्षाने एकजुटीचे समर्थ दर्शन घडविले असते व तथाकथित तात्विक मतभेद बाजूला ठेवले असते ते काँग्रेसचे आजचे रूप कदाचित वीसेक वर्षांपूर्वीच दिसले असते.   

सत्तेला चिकटलेले लोक घराणेशाहीचे समर्थक

आजही काँग्रेसचे खरे विरोधक त्यांच्याच पक्षात आहेत. ६०, ७०, ८० च्या दशकांत सत्तेतील सुखासीनतेमुळे आलेली बेफिकिरी अद्याप जात नाही. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर राज्यातील सत्ता आजही काही ठराविक घराण्यांतच आहे. त्यांच्या घराण्यात जन्माला आलेले मूल हे त्यांच्या ताब्यात असलेले साखर कारखाने, सूतगिरण्या, शिक्षणसंस्था, वर्चस्वाखालील सहकारी बँका यांचे भावी अध्यक्ष पुढे भावी आमदार, खासदारच असते. त्या त्या जिल्ह्यांतील आपल्या सत्तास्थांनाना धक्का लागू नये म्हणून आपापल्या राजकीय विरोधकांबरोबर त्यांचे गुळपीठ असते. हे विरोधक लोकांसमोर विरोधक म्हणून आणि पडद्यामागे मित्र म्हणून वावरत असतात.

त्यामुळे काँग्रेस आपल्या कुटुंबापुरतीच राहिली तरी त्या नेत्यांना चालते. काँग्रेसचे नेतृत्व त्यांना आळा घालू शकत नाही किंवा तुमच्या प्रभावक्षेत्रात आपला पक्ष तुमच्या कुटुंबापुरताच मर्यादित का आहे हे विचारू शकत नाही. माझ्या कुटुंबातील सदस्यालाच तिकिट दिले तर अमुक एक जागा निवडून येऊ शकते किंवा मी आणू शकतो असे सांगायचे अन पक्षानेही ते ऐकायचे. मग पक्षाचे समर्थक कसे वाढतील?

आज अशा नेत्यांचे जे लोक कार्यकर्ते म्हणून मिरवतात ते मानी कार्यकर्ते नसून बऱ्याचदा लाभार्थी कार्यकर्ते असतात. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची छोटी-मोठी कंत्राटे, एखादी शाळा, स्वयंसेवी संस्थेच्या नावावर सामाजिक न्याय वा आदिवासी विभागाकडून अनुदान मिळणारी एखादी संस्था चालवायला मिळते. त्यातून मिळणाऱ्या लाभावरच त्यांची त्यांच्या पक्षाच्या ध्येय-धोरणाची व्याख्या ठरते.

वर कळस म्हणजे काँग्रेसचे नेतृत्व असे विचारतही नाही की, बीड, परभणी, जळगाव, उस्मानाबाद, जालना अशा काही जिल्ह्यांत काँग्रेसची अवस्था वर्षानुवर्षे वाईट का आहे, किंवा बऱ्याचशा जिल्ह्यांत बड्या नेत्यांच्या तालुक्याबाहेर पक्ष का वाढत नाही. कारण तसे विचारले असते वा पक्ष वाढवणे हा निकष ठरविला असता तर काही लोक पक्षात सतत पदे मिरवताना दिसलेच नसते.

पक्षाची अवस्था अतिशय चिंतानजक अवस्थेत म्हणजेच आयसीयुमध्ये गेल्यासारखी असल्याने आता कुठे काँग्रेसमध्ये घराणेशाहीवर मंथन सुरू झाले आहे. पण या पक्षाच्या नेतृत्वाने याला कधीच लगाम घातला नाही. घराणेशाहीवर कोणी बोलले की काँग्रेसच काय इतर पक्षातील लोकसुद्धा डॉक्टर, वकील, कलावंत आदींची उदाहरणे देतात. पण त्या व्यवसायात स्थिरावायला त्या त्या विषयातील कौशल्य लागते. राजकारणात मात्र वरून तिकिट निश्चित करून आणले आणि स्थानिक पातळीवर विरोधातला पक्ष व्यवस्थित हाताळला की मतदारांपुढे पर्याय उरत नाही. आपल्या प्रभावक्षेत्रात पर्याय निर्माण होऊ द्यायचा नाही त्यासाठी विरोधी पक्षाला इतरत्र मदत करून त्याची परतफेड करायची, त्यावर पक्षाच्या नेतृत्वाने काहीही बोलायचे नाही. मग आजची अवस्था होणार नाही तर काय होणार?

काँग्रेसचा जनाधार कमी होत गेला

काँग्रेसचे नेतृत्व नेत्यांच्या मनमानीला लगाम घालू शकले नाही. ना त्यांच्या संस्थातील गैरव्यवहारांना आवर घालू शकले नाही ना त्यांनी सरकारमधील पदावर असताना केलेल्या घोटाळ्यांना. अनेकांवर गैरव्यवहारांचे आरोप चिकटले, न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढले तरी पक्षाने त्यांना बाजूला केले नाही. जिल्ह्या जिल्ह्यात संस्थांचे जाळे उभारणे वाईट नाही पण त्या संस्थांच्या माध्यमांतून लोकांचे शोषण होतेय हे आरोप चिकटत गेले. लोकांना अवलंबून ठेवून आपले इप्सित नेतेमंडळी साध्य करीत असल्याने सुशिक्षीत पांढरपेशा मतदार व तरुणवर्ग झपाट्याने दूर होत राहिला. भाजपाच्या काही चुकांमुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काही विभागांत प्रामुख्याने विदर्भात काँग्रेसच्या जागा वाढलेल्या दिसतात.

पक्षाला तालावर नाचावणारांची चलती

सहकारी संस्था, शिक्षणसंस्था यांचे जाळे विणत काही बडे नेते मातब्बर होत गेले आणि पक्षाला आपल्या इशारावर चालवू लागले हे काँग्रेसचे एक दुखणे आहे. कारण ही संस्थानिक मंडळी मला डावलाल तर पक्षाची अवस्था यापेक्षा बिकट होईल, असा इशारा देत असतात आणि आपल्याला वाटते तसे राजकारण करत राहतात. या पक्षात एक असाही काळ होता की एका विशिष्ट वयात नेतेमंडळी राजकीय निवृत्ती जाहीर करून कोणालाही संधी द्या मी त्याला पाठिंबा देईन असे म्हणत. अशी निवृत्ती जाहीर केल्यानंतर बाळासाहेब भारदे (नगर), यशवंतराव चव्हाण (कराड-सातारा), केशवराव सोनवणे (लातूर) आदी पुन्हा कधीच सक्रीय राजकारणात दिसले नाहीत.

बड्या नेत्याचा समर्थक म्हणूनच काँग्रेसमध्ये कार्यकर्ता टिकतो, पक्षाचा म्हणून नाही. आपल्याला मर्यादित भवितव्य आहे हे त्याने मान्य केलेले असते. त्यामुळे पक्षाचे समर्थक वा कार्यकर्ते वाढत नाहीत. नेत्यांना कोणत्या वेळेला काय लागते याची काळजी घेण्यासाठी कोण झटेल? तसेच पक्षाच्या तालुका व जिल्हा कार्यकारिणीमध्ये नेत्यांच्या जवळच्यांनाच संधी मिळते, पक्षाचा सच्चा वा निष्ठावान अनुयायी हा प्रकार जवळपास संपलाच आहे.

प्रादेशिक पक्षच काँग्रेसच्या मुळावर

प्रादेशिक पक्षांना ध्येय धोरणे नाहीत आणि ते सध्याच्या सत्ताधारी पक्षाविरोधात लढा देऊ शकत नाहीत, असे काहीसे राहुल गांधी बोलून गेले. आता त्यांनी खुलासाही केला आहे. पण त्यांची एकूणच भूमिका काय हे लोक समजून गेले आहेत.

अनेक प्रादेशिक पक्षांची निर्मिती ही काँग्रेसमधील अंतर्गत दुफळीचा परिणाम आहे. काँग्रेस नेतृत्वाशी मतभेद होऊन बाहेर पडलेल्या नेत्यांनीच त्या त्या राज्यातील प्रादेशिक पक्षांची स्थापना करून काँग्रेसला सत्ताभ्रष्ट केले आहे.

काँग्रेसला भाजपाच्याही आधी आपल्याच पक्षातून बाहेर पडून निर्माण झालेल्या प्रादेशिक पक्षांसोबत लढायचे आहे. आज काँग्रेसची दाणादाण उडविणारे तृणमूल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस हे पक्ष काँग्रेस विचारधारेतील लोकांनीच निर्माण केलेले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीत राहूनच काँग्रेसला सत्ता मिळते आहे. राष्ट्रवादीची स्थापना शरद पवार यांनी काँग्रेशी फारकत घेऊनच केली आहे.

एखाद्या राज्यात काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष सक्षम पर्याय ठरू शकत नाही तेव्हा प्रादेशिक पक्ष मोठा होतो. महाराष्ट्रात एकेकाळी कम्युनिस्ट पक्षांचा मुंबईवरील पगडा कमी करण्यासाठी शिवसेनेला मजबूत करणारी भूमिका काँग्रेसने घेतली. त्याच काँग्रेसला १९९५ मध्ये राज्याच्या सत्तेतून सेनेने भाजपाच्या मदतीने सत्ताभ्रष्ट केले. १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करत काँग्रेसला आघाडी करण्यावाचून पर्याय ठेवला नाही. आज त्या प्रयोगामुळेच थोडीफार का असेना काँग्रेसकडे सत्ता दिसते. एकूणच काय तर काँग्रेसला भाजपाच्या विरोधात सक्षमपणे उभा राहण्याआधी अनेक अडथळे पार करायचे आहेत. ते पार केल्यानंतर भाजपासमोर उभे ठाकण्याची क्षमता असलेली फळी उभी करता येईल. दिल्ली अभी बहोत दूर है.