कोविड मृत्यू : भरपाईसाठी ७०० कोटी लागणार

कोविड१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीमागे ५० हजार रुपये भरपाई द्यावयाची झाल्यास राज्य सरकारला ७०० कोटी रुपये लागणार आहेत, असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या असून राज्य सरकार आपल्या पातळीवर किमान २५ टक्के रक्कम बाजूला काढून ठेवण्याच्या तयारीला लागले आहे.

या भरपाईतील ७५ टक्के रक्कम केंद्र सरकार देईल, असा राज्याला विश्वास आहे. याचे कारण आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार अशी भरपाई देय तर ठरतेच शिवाय केंद्र त्यासाठी ७५ टक्के वाटा उचलते. नियमातच ही तरतूद असल्याने राज्य सरकारवर तितका बोजा येणार नाही.

सध्या कोविड१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना भरपाई द्यावी अशा मागणीबाबतचे एक प्रकरण न्यायालयात सुरू आहे. आपत्तीत अशा प्रकारची भरपाई द्यावी देणे अपेक्षित असल्याने न्यायालयाचा निकालही तसाच येईल हे गृहित धरून राज्य सरकारने तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्याची मदार केंद्रावर

राज्यात आजवर एकूण १ लाख ३९ हजार रुग्ण कोविडची बाधा झाल्यामुळे मृत्यू पावल्याची सरकारी आकडेवारी आहे. हा आकडा १ लाख ४० हजार असा गृहित धरून सरकार आपल्या वाट्याची रक्कम देण्याची तयारी ठेवत आहे. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. पण केंद्र ७५ टक्के वाटा उचलणार हे अपेक्षित असल्याने हा बोजा उचलला जाऊ शकतो. जर १०० टक्के रक्कम उभारण्याची वेळ आली असती तर मात्र राज्य सरकारची मोठी दमछाक झाली असती, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

सरकारपुढे निधी उभा करण्याचे आव्हान असल्यानेच जुलै महिन्यातील  अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल देय असलेली आर्थिक मदत अद्याप देता आलेली नाही. त्यामुळेच राज्य सरकारला केंद्राच्या मदतीवर अवलंबून रहावे लागते. अलीकडच्या काही वर्षांत अतिवृष्टी, पूर, वादळ अशा आपत्तींसोबतच गेले दोन वर्षे कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना सरकारला करावा लागत आहे.

सर्वेक्षणातून दिलासादायक बाब उघड

सध्याची कोविडबाबतची आकडेवारी मात्र राज्य सरकारला दिलासा देणारी आहे. मुंबईत केलेल्या एका पाहणीनुसार लस न घेतलेल्या ७८ टक्के लोकांच्या शरिरात प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार झाली आहेत. याचा अर्थ त्यांना कोरोनाच्या विषाणूची बाधा झाली होती व त्यातून ते बाहेर पडले आहेत. तसेच लस घेतलेल्या ८९ टक्के लोकांच्या शरिरात प्रतिपिंडे तयार झाली आहेत, असेही आढळून आले आहे. या आकडेवारीमुळेच राज्य सरकारने शाळा, मंदिरे, सिनेमा आणि नाट्यगृहे खुली करण्यास अनुमती दिल्याचे समजते.   

ताज्या आकडेवारीनुसार राज्यात दैनंदिन रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्के असून तो आजवरच्या आकडेवारीची तुलना करता सर्वात कमी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून मृत्यूदर १.२३ टक्के आहे. १ ते २१ सप्टेंबर या कालावधीत ९५८ मृत्यूंची नोंद झाली आहे जी यावर्षीच्या एप्रिल महिन्यात नोंदल्या गेलेल्या २९ हजार ५५१ मृत्यूंपेक्षा किती तरी कमी आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांत १०० पेक्षा कमी रुग्ण आहेत. राज्यात सध्या सुमारे ४१ हजार सक्रीय रुग्ण असून त्यापैकी २.८१ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर तर ३.९८ टक्के रुग्ण ऑक्सीजनवर आहेत.

राज्यात सध्या ऑक्सीजन सुविधा उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या १ लाख २६ हजार हून अधिक आहे. तर आयसीयूच्या ३७ हजार १७४ खाटा आहेत. १४ हजार ४४५ व्हेंटिलेटर्स सुविधा उपलब्ध आहेत. तर रुग्णांसाठी आयसोलेशन खाटा ३.४० लाख एवढ्या उपलब्ध आहेत. राज्याला आजवर ६.४६ कोटी एवढ्या लस मात्रा उपलब्ध झाल्या असून त्यापैकी कोव्हीशील्डच्या ५.५५ कोटी तर कोवॅक्सीनच्या ९०.५९ लाख आहेत. एकूण लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या ७.५० कोटी आहे. विशेष म्हणजे पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. अशांची संख्या तीन कोटीहून अधिक आहे.

२३ सप्टेंबर रोजी राज्यात कोरोनाने बाधित असलेल्या ६१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.