भाजपाला हवा असलेला ‘महाआशिर्वाद’ आणि उद्दिष्ट

शपथविधी पार पडल्यानंतर जवळपास दीड महिना दिल्लीत तळ ठोकण्यास भाग पाडले गेलेले भाजपाचे नवे मंत्री राज्याराज्यात परतले तेव्हा त्यांना महाआशिर्वाद  यात्रेद्वारे लोकांसमोर जावे लागले. ही यात्रा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित असेल असे वाटले होते पण देशातील बहुतेक भागात ती काढली जात आहे. पण त्याची चर्चा दोन राज्यात जास्त होईल आणि ती राज्ये आहेत- महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल. या दोन्ही राज्यांत सत्तेद्वारे वरचस्मा गाजविण्याचा भाजपाचा मनसुबा लपून राहात नाही आणि तिथे या पक्षाचा अतिशय कडवा संघर्ष सत्ताधारी पक्षासोबत सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे महाआशिर्वाद यात्रा सुरू होते न होते तोच ममता बॅनर्जी यांच्या सरकारने आपत्ती निवारण कायद्यासकट अन्य काही कायद्यांतील कलमे लावत या यात्रेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून टाकले. याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणे क्रमप्राप्त होते. त्याप्रमाणे नारायण राणे यांची महाआशिर्वाद यात्रा मुंबईत सुरू होताच शिवसेना नेतृत्त्वाखालील सरकारने एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल करण्याचा सपाटा सुरू केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा सत्ताधारी तृणमूल काँग्रेससोबत उभा दावा आहे. महाराष्ट्रात हा कडवटपणा थोड्याफार तसाच आहे. मात्र त्यात काहीसा फरक एवढाच आहे की केंद्रातल्या काही भाजपा नेत्यांसोबत शिवसेनेचे जरा बरे संबंध आहेत. 

मात्र राणे आणि शिवसेना यांच्यात विस्तव आडवा जात नाही. राणे यांनी मुंबईत आल्याबरोबर यात्रेला सुरूवात करतानाच सेनेवर तोफ डागली आणि मुंबई महानगरपालिकेतील ३२ वर्षांची सेनेची सत्ता खेचून घेणार अशी गर्जना केली. त्यामुळे वातावरण आपसुकच तापले. राणे यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन दिवंगत सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतरही हे वातावरण काही निवळले नाहीच. वरताण म्हणून सेनेने त्या स्थळाचे शुद्धीकरण केले.

बंगाल असो वा महाराष्ट्र ही तणातणी भाजपाला हवी असणार यात शंका नाही. मूलभूत मुद्द्यांपेक्षा काही अन्य मुद्यांवर वातावरण तापलेले या पक्षाला हवेच असेल. कारण, कोरोना साथीमुळे लोकांचे आर्थिक प्रश्न बरेच गंभीर झालेले आहेत. पेट्रोलजन्य पदार्थांच्या दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. मध्यमवर्ग भाजपावर बराच नाराज आहे. अशा वेळेला मुद्यांवरील चर्चा गुद्यांवर गेली तर मूळ मुद्दे बाजूला पडतात. आपले जनमानसही राजकीय नेत्यांच्या शाब्दिक चकमकी, खडाखडी याकडे अधिक लक्ष देते आणि त्यावर चर्चा करण्यात रस घेते, हे नेहमी दिसून येते.

बंगालमध्ये तर आता लगेच काही निवडणुका नाहीत. पण महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिकेपाठोपाठ अन्य महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आदींच्या निवडणुकांचा मोठा कार्यक्रम आहे. त्यावेळी भाजपाचा सामना सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधल्या तीन घटक पक्षांशी आहे. सत्तेचा फायदा घेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष भाजपाला जेरीला आणणार यात शंका दिसत नाही. अशा वेळी राणे आणि अन्य नेते सेनेला डिवचत राहणार आणि चर्चेचा झोत कायम शाब्दिक चकमकी आणि वैयक्तीक उणीदुणी यावर राहणार.

भाजपाने राणे आणि त्यांच्या चिरंजीवांना जाणीवपूर्वक पक्षात घेतले. खरेतर कोकणात एकेकाळी भाजपाचे चांगले वर्चस्व होते. कै. श्रीधर नातू, अप्पासाहेब गोगटे यांच्यासारख्या नेत्यांनी वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा उंच ठेवला. कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांवरही भाजपाचा वरचस्मा होता. तो कमी होत गेला. अलीकडे विनोद तावडे, आशिष शेलार ही मंडळी कोकणात काही करू पाहताहेत असे दिसत असतानाच गडबड झाली. ती का झाली हे कळेपर्यंत तावडे यांना अन्य राज्यांच्या जबाबदाऱ्या देऊन बाहेर पाठवले गेले. शेलार यांनाही बहुदा मोकळीक दिली गेली नाही. रायगडमध्ये रामशेठ ठाकूर आणि त्यांचे चिंरजीव प्रशांत ठाकूर यांना जवळ केले गेले. पाठोपाठ प्रवीण दरेकर आले. त्यानंतर राणे पिता-पुत्र भाजपात प्रवेश करते झाले. त्यामुळे आज भाजपाचा झेंडा या अन्य पक्षांतून स्वागत केलेल्या नेत्यांच्या खांद्यावर दिसतो आहे.

ठाण्यातून वेगळे झालेल्या पालघर या जिल्ह्यात जुणेजाणते विष्णू सावरा व चिंतामण वनगा यांचे चांगले बस्तान होते. त्यांच्या पश्चात पक्षावर बाका प्रसंग ओढवला आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत तर काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावीत यांना स्वीकारत खासदारकी द्यावी लागली. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सेनेबरोबर युती करण्यासाठी पालघर मतदारसंघ राजेंद्र गावित यांच्यासकट सोडून द्यावा लागला आहे.

एकवेळ इथवर ठिक होते. पण राज्याच्या राजधानीचे शहर असलेल्या मुंबईत भाजपाला नारायण राणे यांची गरज भासावी यात खूप काही आले. मुंबईत भाजपाची स्वतःची यंत्रणा आहे. ८० हून अधिक नगरसेवक आहेत. तीन खासदार आणि १६ आमदार आहेत. तरीही त्यांना सेनेसमोर राणे हवे आहेत. महाआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने हे स्पष्टच झाले आहे. स्वतःचे निष्ठावान नेते असतानाही राणे का हवे याचे कारण काय असू शकते तर, मुंबईत शिवसेनेसमोर सेनेच्याच भाषेत उत्तर देणारा आणि बहुसंख्येने असणाऱ्या मूळ कोकणस्थ मराठीभाषिक मतदारांना आवाहन करू शकणारा नेता भाजपाला राणे यांच्या रुपाने हवा आहे. सेनेला अस्वस्थ करू शकणारे, त्यांच्याच राडा संस्कृतीला साजेसे प्रश्न राणे उपस्थित करू शकतील ज्यायोगे सेना बेजार होईल, असेच बहुदा भाजपाच्या नेत्यांना वाटत असावे अन्यथा स्वतःकडे मंत्रीपदी बसविण्यासाठी खंडीभर खासदार असताना राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिले गेले नसते.

वर्षानुवर्षे भाजपात कार्यरत असणाऱ्या निष्ठावान नेते-कार्यकर्ते यांना पक्षाची ही आगतिकता अस्वस्थ करत असेल. पण भाजपाच्या नेतृत्वाने देखील अशा प्रकारचे नेते-कार्यकर्ते घडविण्याचा किंवा कोणावर विश्वास टाकण्याचा प्रयत्न केलेला नाही. ज्यांच्यामध्ये अशी थोडीफार धमक होती ते २०१४ आणि २०१९ मध्ये देशात मिळालेल्या यशाने व केंद्रातील सत्तेमुळे हुरळून गेले. २०१४ मध्ये महाराष्ट्रात मिळालेल्या यशामुळे तर त्यांना आभाळ ठेंगणे झाल्यासारखे वाटू लागले. तिथेच गफलत झाली आणि पाहता पाहता राज्यातील सत्तेचे जाजम सेना आणि राष्ट्रवादीने खेचून घेतले. काँग्रेसला तेच हवे होते त्यामुळे हा पक्षही सत्तेत सामील झाला.

या साठमारीत भाजपाला स्वतःच्या मूळ केडरपेक्षा अन्य पक्षांतून आलेले नेते बरे असेच वाटू लागल्याचे दिसते. कारण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेले कपिल पाटील (भिवंडी) आणि २०१९ च्या आधी राष्ट्रवादीत असलेल्या भारती पवार (दिंडोरी) हे दोन खासदार केंद्रीय मंत्रीमंडळात सामील करून घेतले गेले आहेत. त्यासाठी भाजपाच्या प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे या दोन जुन्या निष्ठावान नेत्यांना मंत्रीपदाचे राजीनामे देत जागा रिक्त करून द्यावी लागली. हा बदलत्या काळाचा महिमा आहे.

राणे यांच्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह अन्य ठिकाणी सेनेसह अन्य सत्ताधारी पक्षांना रोखून धरण्यात भाजपाला यश मिळेल का ? किंवा सध्याचे स्थान टिकवून ठेवता येईल का? हे दोन मोठे प्रश्न आहेत. अनेक वादग्रस्त विषय बाहेर येऊनही सरकारबद्दल जनमत अतिशय वाईट झाले आहे किंवा त्यात भाजपाला काही भर घालता आली आहे हे दिसून येत नाही. याचे खरे प्रतिबिंब आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतच उमटेल. तोवर भाजपाला राणे, कपिल पाटील आणि भारती पवार यांच्या मंत्रीपदांमुळे राजकीय वातावरण काही बदलते का याची प्रतिक्षा करावी लागेल.

राणे जेव्हा जेव्हा सेनेविरोधात बोलतात तेव्हा सैरभैर झालेल्या शिवसैनिकांनाही चेव येतो. ते एरवी सुस्त असले तरी राणेंच्या टिकेनंतर ते सावरून सज्ज होतात. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत असे झाले तर मात्र भाजपाला फारसे काही करता येणार नाही. फक्त आहे तेवढ्या जागा राखून धरण्याचे आव्हान पेलावे लागेल. त्यानंतर राणे यांच्याकडून भाजपाला कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाबद्दल अपेक्षा असणार. तसेच कपील पाटील यांनी भिवंडी तर राखावीच शिवाय कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी काही करावे अशी अपेक्षा असणार.

तिकडे भारती पवार यांनी स्वतः प्रतिनिधित्व करत असलेल्या दिंडोरीसह आदिवासीबहुल पालघर, आणि नंदुरबार तसेच नाशिक आणि धुळे लोकसभा मतदारसंघासाठी परिश्रम घ्यावे अशी अपेक्षा असणार. महाआशिर्वाद यात्रेचा तोच खरा उद्देश आहे.

भाजपाचे निष्ठावान डॉ. भागवत कराड यांच्यामुळे मराठवाड्याला एक जादा मंत्रीपद मिळाले आहे. मुंडे भगिनींना राजकीय ताकद द्यायची नसल्यामुळेच त्यांना संधी मिळाली. वंजारी समाजाचे मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी जिल्ह्यात लक्षणीय मतदान आहे. नांदेड व हिंगोली भागातही बरीच लोकसंख्या आहे. हा समाज भाजपापासून दूर जाऊ नये म्हणून कराड मंत्री झाले. त्यांना समाजाला बांधावे लागले. त्यासाठी त्यांचीही यात्रा सुरू झाली आहे.