फडणवीसांच्या भेटींचे कवित्व

राजकारणाचे दुसरे नाव अनिश्चितता आहे. इथे सोयीनुसार एकामेकांच्या फायद्यासाठी मैत्री आणि शत्रुत्व बदलत असते. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जात होते तोवर ते त्यांचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ सहकारी आणि सध्याचे कटट्टर विरोधक एकनाथ खडसे यांच्या जळगाव जिल्ह्यातील घरी गेले. तिथे त्यांनी खडसेंच्या स्नुषा आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली.

मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान वा नंतर फडणवीस यांच्या पवार व खडसे यांच्यासोबत बऱ्याच राजकीय चकमकी झडल्या आहेत. त्यातून निर्माण झालेली कटुता पुढे वाढतच गेली. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही भेटी काहींशा अनपेक्षित वाटतात. गतवर्षी याच काळात पवार आणि फडवणीस यांनी वृत्तपत्रांना मुलाखती देताना परस्परविरोधी दावे केले होते. त्याची मोठी चर्चाही झाली. भाजपा आणि राष्ट्रवादीने सत्ता स्थापन करावी, असा प्रस्ताव पवारांकडून आला होता, असे फडणवीस म्हणाले. पण पवार यांनी ते फेटाळून लावताना भाजपाचीच मंडळी त्यांच्याकडे असा प्रस्ताव घेऊन आली होती असा दावा केला. यात नेमकं खरं कोण बोलत होतं आजवर तरी स्पष्ट झालेलं नाही. पुढे या दोघाही नेत्यांनी हा विषय बाजूला ठेवला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळी किंवा शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसची सत्ता आल्यानंतर पवारांनी फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका करण्याची संधी सोडली नव्हती. पण, राजकारणात कडवटपणा असला तरी नेत्यांमध्ये वैयक्तीक पातळीवर मैत्रभाव असल्याचे बऱ्याचदा दिसून येत असते. पवार यांच्यावर अलीकडेच दोन शस्त्रक्रिया झाल्या त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण त्यांची भेट घेतली असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. थोडक्यात काय तर वैयक्तिक विचारपूस करण्यासाठी ही भेट होती, असा अर्थ त्यातून घ्यायचा. पण ही भेट झाल्याचे ट्वीट फोटोसकट फडणवीसांकडून लगेच केले जाते पण पवारांकडून ते होत नाही, यातून बराच अर्थ काढला जाऊ शकतो.

राजकारणात सहसा कोणतीही भेट उगाच होत नाही. आणि त्यातून काही तरी संदेश गेला पाहिजे याचीही काळजी राजकारणातील मंडळी घेत असतात. जेव्हा अशी भेट जाहीर केली जाते तेव्हा त्यामागेही बरीच कारणे असतात. तरीही पवार आणि फडणवीस यांच्या बैठकीत एक मुद्दा विशेषत्वाने निघाला असणार आणि तो म्हणजे मराठा आरक्षणाबाबत सध्या निर्माण झालेले वातावरण आणि संभाव्य आंदोलन. भाजपा आपल्या काही मराठा नेत्यांना पुढे करून आंदोलन सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे करोनाच्या काळातच सामाजिक शांततेला गालबोट लागू नये, याची काळजी सत्ताधारी लोकशाही आघाडी सरकार घेत आहे. त्यातच भाजपाच्या शिफारशीने राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर पाठवले गेलेले  संभाजीराजे यांनी आपला मार्ग स्वतंत्रपणे निवडला आहे. ते सर्वपक्षीय सामंजस्य तयार व्हावे म्हणून सर्व नेत्यांच्या भेटी घेत आहेत तर भाजपाची भूमिका आक्रमक आंदोलन केल्याशिवाय मार्ग निघणार नाही, अशी आहे.

संभाजीराजे अलीकडेच मुंबईत येऊन पवार आणि फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण आणि राज ठाकरे यांना भेटून गेले. पवारांनी बहुधा संभाजीराजेंना काही कानमंत्र दिला असावा. कारण संभाजीराजे यांचीही राष्ट्रवादीशी जुनी जवळीक आहेच. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. पण राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सदाशिवराव मंडलीक यांनी त्यांचा पराभव केला होता. पवारांच्या भेटीनंतर राजे फडणवीसांना भेटले आणि त्यावेळी काही चर्चा झाली. त्याबाबत फडणवीसांना पवार यांच्याशी काही मुद्द्यांवर बोलायचे असणार याची शक्यता जास्त आहे.

याशिवाय सत्ताधारी महाविकास आघाडीला त्रासदायक ठरणारा आणखी एक निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून आला आहे. तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना देण्यात आलेले राजकीय आरक्षण रद्द करण्याबाबतचा. यावरही भाजपाने जोरदार भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे राजकीय वातारवण तापत चालले आहे. हा ही विषय पवार आणि फडणवीस यांच्या भेटीत निघालेला असू शकतो.

संभाजीराजेंनी स्वतंत्र मार्ग निवडला असल्याने भाजपकडून आता राज्यसभेचे सदस्य उदयनराजे भोसले यांनी आंदोलनाचे नेतृत्व करावे असा प्रयत्न केला जात आहे. हे राजे भाजपाकडून आंदोलनात आघाडीवर राहिले तरीही सरकारची डोकेदुखी वाढू शकते. या परिस्थितीत जोपर्यंत राजकीय एकमत होत नाही तोपर्यंत राज्यात शांतता व सामंजस्य नांदणार नाही, हे स्पष्ट आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येऊन सरकार बनवतील का यावर चर्चा सूर आहे. परंतु राष्ट्रवादी व भाजपमधील राजकीय घडामोडींचा बारकाईने अभ्यास करणारे या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत. युती, आघाडी याच्या राजकीय निर्णयप्रक्रियेत पवार राज्यातील नेत्यांसोबत चर्चा कधीच करत नाहीत. काँग्रेससोबत ते १९९९ पासून आघाडीत आहेत पण ते कधीही राज्यातल्या नेत्यांना याबाबत बोलत नाहीत. ही प्रक्रिया कायम दिल्लीतील नेत्यांसोबत चर्चा करूनच ठरते. भाजपाबाबतही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी वा त्या पक्षातील अन्य ज्येष्ठ नेत्यांशी थेट बोलू शकतात.

राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपा एकत्र येणे ही गोष्ट इतकी सोपी नाही. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, कार्यकर्ते यांची वेगळी मते असतात. पवारांचे कट्टर समर्थक सदाशिवराव मंडलिक यांनीही अशाच विषयांवर मतभेद झाल्याने बंडखोरी केली होती. हा इतिहास फार जुना नाही.

पवारांना भेटल्यानंतर दुसर्‍याच दिवशी फडणवीस आपल्या राज्यव्यापी दौर्‍याचा एक भाग म्हणून जळगावला गेले आणि तिथे ते मुक्ताईनगरला खडसे यांच्या घरी गेले. सध्या राष्ट्रवादीत असलेले खडसे घरी नव्हते पण त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे अद्यापही भाजपात आहेत. फडणवीस आणि खडसे यांचे संबंध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट गाजते आहे.  

खडसेंच्या घरी जाणे फडणवीसांनी यासाठी महत्त्वाचे मानलेले दिसते की रावेर लोकसभा हा भाजपाचा पारंपरीक मतदारसंघ आहे. उद्या जर एकनाथ खडसे यांनी सुनबाईंना राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवा असा आग्रह धरला तर तिथे आज तरी भाजपाकडे रक्षा यांच्या तुलनेत सक्षम उमेदवार नाही. तशातच भाजपाला जळगावात गळती लागली आहे. मुक्ताईनगर नगर पंचायत आणि जळगाव महापालिकेतील भाजपाचे सदस्य अलीकडेच शिवसेनेत गेले. पक्ष संघटना कमकुवत होत आहे. या सर्व पडझडींच्या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांच्याशी भेट आणि चर्चा फडणवीसांना महत्त्वाची वाटते. यावेळी जळगाव जिल्ह्यातील भाजपाची राजकीय भुमिका ठरविणारे गिरीश महाजन हे ही उपस्थित होते, हे महत्त्वाचे आहे.

या भेटीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत असलेले खडसे पवारांना भेटायला गेले. खडसे यांची भेट सदिच्छा वा आजारपणाची चौकशी म्हणून पाहिली जात असली तरी फडणवीस यांच्या पवार भेटीबद्दल त्यांची उत्सुकता नाकारता येत नाही. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप यांच्यात उद्या समजा काही समझोता झालाच तर त्याचा सर्वात मोठा दणका खडसेंना बसू शकतो.

हे व असे बरेच अर्थ या भेटींमधून निघतात. आगामी काळात मराठा, ओबीसी आरक्षणांतून सरकार कसा मार्ग काढते, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तेव्हा काय चित्र दिसते यावर राज्याच्या राजकारणाची दिशा अवलंबून आहे.