ठाकरे यांचा पुतळा- काही नवे पायंडे…

दक्षिण मुंबईतील राष्ट्रीय आधुनिक कला दालनाच्या वास्तूसमोर उभारण्यात आलेला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९ फूट उंचीचा आकर्षक असा पुतळा लोकांच्या आकर्षणाचे नवे केंद्र बनू पाहत आहे. लोक मोठ्या औत्सुक्याने हा पुतळा पाहण्यासाठी येत असल्याचे दृष्य गेल्या ३-४ दिवसांत दिसून येत आहे. शनिवारी, दि. २३ जानेवारी २०२१ रोजी या पुतळ्याचे अनावरण झाले त्याप्रसंगी राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. राजकीय वैरभाव अशा प्रसंगी कसा बाजूला ठेवला जातो याचा गौरवपूर्ण उल्लेख कार्यक्रमात करण्यात आला.

आता या पुतळ्याच्या उभारणीविषयी काही वेगळे मुद्दे उपस्थित झाले तर बहुदा काहींना आवडणारही नाहीत. पण आपल्या राजकीय आयुष्यात प्रखर टिकेचा सामना त्यांनी सातत्याने केलेला दिसून येतो. कठोर टीका असो वा आरोप, ते ठाकरे यांनी समोरच्याला घायाळ करणाऱ्या शब्दांनीच परतविले. त्याचबरोबर त्यांना व्यंगचित्रकार म्हणून लाभलेल्या देणगीचा त्यांनी एक जबरदस्त शस्त्र म्हणून वापर आपल्या टिकाकारांची तोंडे बंद करण्यासाठी केला.

पुतळ्याचे अनावरण करण्यापूर्वी विरोधाचे काही क्षीण आवाज लोकांच्या कानावर आले होते. अर्थात हा विरोध ठाकरे यांना नव्हता तर त्यांचा पुतळा उभारण्यासाठी निवडण्यात आलेल्या जागेला होता. विरोधकांच्या मते पुतळा कसा उभारावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात काही भाष्य केलेले आहे. तसेच चौक, प्रमुख रस्ते येथे पुतळा उभारण्याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वेसुद्धा आखून देण्यात आली आहेत. विरोध करणारांनी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदविण्याचा प्रयत्न केला. पण हा विरोध तेवढ्यापुरताच ठरला. पुतळा उभारणीबाबत राज्य सरकारने केलेल्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात एक समिती असून तेथील जिल्हाधिकारी हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत.

सुमारे १२०० किलो ब्राँन्झचा वापर करून बनविलेला हा पुतळा १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर बसवण्यात आला आहे. तो पाहिला की इतर भव्य पुतळ्यांचीही आठवण येते. ठाकरे यांचा पुतळा ज्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात बसविण्यात आला आहे त्याच्या दक्षिणेकडील बाजूस रिगल सिनेमागृहाजवळ दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा आहे. या चौकातील वर्तुळाकार परिसराच्या मध्यभागी ऐतिहासिक वेलिंग्टन कारंजे आहे. शास्त्री यांच्या पुतळ्यापासून काही अंतरावर गेटवे इंडियाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा आहे.  

या तिनही पुतळ्यांकडे पाहिले तर दिवंगत शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या पुतळ्यात काही वेगळे आहे असे दिसून येते. ते वेगळेपण आहे येथे लावण्यात आलेल्या कोनशीलेत. दिवंगत लालबहादूर शास्त्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करणाऱ्या व उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या नावाचा उल्लेख असलेल्या कोनशीला त्या त्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरच बसविण्यात आल्या आहेत. मात्र ठाकरे यांचा पुतळा ज्या चौथऱ्यावर आहे तिथे लावण्यात आलेल्या कोनशीलेवर उद्घाटक म्हणून फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव आहे.

ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजपाचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, दिवंगत ठाकरे यांचे पुतणे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आदींची नावे असलेली कोनशीला पुतळ्याच्या बाजूला उभारण्यात आली आहे.

हे असे का व याचे कारण काही राजकीय आहे की अन्य काही, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. कोणाला असाही प्रश्न पडेल की कट्टर राजकीय विरोधक मनसे प्रमुख राज ठाकरे वा देवेंद्र फडणवीस यांची नावे पुतळ्याखालीच नको होते की काय, आदी.

कारण अनावरण कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा उल्लेख असलेल्या कोनशीला राज्यात इतरत्र उभारण्यात आलेल्या पुतळ्यांच्या चौथऱ्यावरच आहेत. दिवंगत पंतप्रधान शास्त्री यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरील कोनशीलेवर ज्यांच्या हस्ते अनावरण झाले ते तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील, त्यावेळी उपस्थित असलेले तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शास्त्रीजींचे सुपुत्र अनिल, तत्कालीन स्थानिक खासदार मिलिंद देवरा व स्थानिक आमदार ऍनी शेखर यांची नावे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर उद्घाटक तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व पुतळा उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावलेले तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांची नावे आहेत.

गेल्या काही दशकांचा विचार केला तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे सर्वात प्रभावशाली असे नेते होते. त्यांच्या पुतळ्याच्या उभारणीनंतर आता राज्य सरकारच्या २०१७ सालच्या पुतळा उभारणीबाबतच्या धोरणावरही कोणी प्रश्न उपस्थित करण्याचे कारण असणार नाही. या धोरणानुसार जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पोलीस, महसूल, वाहतूक विभागाचे प्रतिनिधी आहेत. सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारायचा असल्यास त्याला या समितीची मान्यता लागते.

या धोरणातील नियमावलीनुसार कोणाचाही पुतळा उभारण्यासाठी शासकीय तिजोरीतून निधी दिला जात नाही. ठाकरे यांचा पुतळा प्रबोधन प्रकाशन प्रा. लि. या संस्थेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. या संस्थेतर्फे शिवसेनेचे सामना हे मुखपत्र प्रकाशित केले जाते. विशेष म्हणजे सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत अनावरण कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे दिसले नाही. ते दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी, २४ जानेवारी रोजी पुतळास्थळाला सहकुटुंब भेट देऊन आले.

या कार्यक्रमानंतर आता सार्वजनिक कार्यक्रमाबाबतच्या काही संकेतांकडे कोणी बोट दाखवणार नाही, असे म्हणण्यास वाव आहे. शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही शासकीय-निमशासकीय विभागाने वा संस्थेने कार्यक्रम आयोजित केल्यास स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्याबरोबरच निमंत्रण पत्रिकेत नाव, कोनशीलेवरील उल्लेख, व्यासपीठावरील व्यवस्था करण्याबाबत काही संकेत आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे होते. अशा कार्यक्रमांत संकेतांचे उल्लंघन होऊ नये म्हणून अधिकारीवर्ग जरा अधिकच काळजी घेत असतो.

या कार्यक्रमानंतर सर्वात मोठी पंचाईत कोणाची झाली असेल तर ती भारतीय जनता पार्टीची. कारण दिवंगत ठाकरे व दिवंगत शास्त्री यांचे पुतळे या ज्या भव्य चौकात दोन बाजूना उभे आहेत तो डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक म्हणून ओळखला जातो. पण त्यांचा पुतळा काही या चौकात नाही. डॉ. मुखर्जी हे भारतीय जनसंघाचे संस्थापक ज्या जनसंघातील बहुतेक सर्व नेते एकत्र येऊन पुढे भारतीय जनता पार्टी हा पक्ष स्थापन झाला. भाजपाचे नेते डॉ. मुखर्जी यांचे नाव मोठ्या आदराने घेतात. पण त्यांना त्यांचा पुतळा काही उभारता आला नाही.